लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये अनेकदा दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ लवकरच जलमार्गांमध्ये चालताना दिसू शकणार आहेत. पाणी, दलदल, बर्फावरदेखील चालू शकणाऱ्या या बोटींसंदर्भातील प्रस्तावाचे रशियन कंपनीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले. जल, जमीन व हवाई तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या अत्याधुनिक बोटींमुळे देशांतर्गत जलवाहतुकीला चालना मिळेल. विशेष म्हणजे आग्रा, अलाहाबाद येथे होणारा कुंभमेळा तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी यांचा उपयोग होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. याअंतर्गतच रशिया येथील ‘स्कोल्कोव्हो फाऊंडेशन’अंतर्गत तेथील काही कंपन्यांनी अल्युमिनियमद्वारे ‘हायब्रिड एरोबोट’ तयार केल्या आहेत. याबाबतच्या प्रस्तावाचे त्यांनी नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले. देशांतर्गत जलवाहतूकीसाठी सोयीस्कर असलेल्या या ‘एरोबोट’ अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. सोबतच बर्फातदेखील यांचा उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे या पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील वापरल्या जाऊ शकता. सर्वसाधारण ‘बोट्स’पेक्षा यांचा वेग हा तीन पटीने जास्त असून १७० किमी प्रति तास या वेगाने त्या पाण्यात चालू शकतात. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या ‘हायब्रिड एरोबोट’चे लवकरात लवकर प्रत्यक्ष सादरीकरण करण्याबाबत ‘स्कोल्कोव्हो फाऊंडेशन’ला सांगण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.हवेतदेखील उडू शकते बोटमोठ्या ‘हायब्रिड एरोबोट’मध्ये अत्याधुनिक ‘एव्हिएशन’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे या बोट पाण्याच्या तळापासून तीन मीटर उंचीवर चक्क उडूदेखील शकतात. ही उंची तीन मीटरपर्यंत असू शकते व त्यामुळे नागरी उड्डयन विभागाच्या नियमांचादेखील भंग होत नाही. या बोटींचे ‘स्पेअर पार्ट्स’ सहजपणे उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.