नागपूर : हैदराबादहून सुटलेली सिकंदराबाद निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेस नागपूरपर्यंत बिनापाण्यानेच धावली. प्रवाशांनी याबाबत वारंवार ओरड, तक्रार करूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता.
नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल या गाडीत प्रवास करीत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.५० वाजता ही गाडी हैदराबादहून प्रवाशांना घेऊन निघाली. बी-१ कोचमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी काही नैसर्गिक विधीसाठी गेले असता स्वच्छतागृहात पाणीच नसल्याचे लक्षात आले. त्यांनी या संबंधाने अन्य प्रवाशांना माहिती दिली. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला असावा, काही वेळेत पाणी सुरू होईल, असा समज करून अनेक प्रवासी गप्प बसले. मात्र, एक तास, दोन तास, तीन तास झाले तरी पाणी काही आले नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुढच्या स्थानकावर व्यवस्था होईल, असे सांगून त्यावेळी प्रवाशांना गप्प करण्यात आले. मात्र, बल्लारपूर स्थानक आले तरी पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. सर्व डब्यात दुर्गंधी पसरली होती.
नुसत्याच बाता अन् दावे !
प्रवाशांना अधिकाधिक आणि चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची बतावणी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाची या प्रकारामुळे पोलखोल झाली आहे. रेल्वेचे अधिकारी नुसतेच दावे करत असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकाराची काही प्रवाशांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
जबाबदार कोण, कोणती होणार कारवाई
या संतापजनक प्रकाराला कोण जबाबदार आहे आणि शेकडो प्रवाशांची कोंडी करणाऱ्या या संतापजनक प्रकरणात दोषींवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.