लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०२१ च्या तयारीसाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. २०२० मध्ये नागपूरला १८वी रँकिंग मिळाली आहे. रँकिंग सुधारण्यासाठी मनपाने नागरिकांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचे धडे देण्याची तयारी चालवली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर मनपाला स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये देशात १८ वे स्थान मिळाले होते. जेव्हा की २०१७ मध्ये नागपूर मनपा याच सर्वेक्षणात १३७ व्या स्थानी होते. २०१८ मध्ये ५५ आणि २०१९ मध्ये ५८वे स्थान प्राप्त झाले. या वर्षी टॉप टेनमध्ये येण्यासाठी मनपाने आपले प्रयत्न वेगाने सुरू केले आहेत. कचऱ्यावरील प्रक्रीयेकडेही आता लक्ष पुरविले जाऊ लागले आहे. त्यातच नागरिकांच्या सक्रीय सहभागासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यात चित्रकला, भित्तीचित्र, पथनाट्य, लघुपट, जिंगल्स आदी स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांची नियमावली बनविण्यात आली आहे आणि फेसबुकवर उपलब्ध आहे. प्रत्येक स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांना पाच हजार रुपये, द्वितीय येणाऱ्यास तीन हजार व तृतीय येणाऱ्यास एक हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. नागपुरातील रहिवासीच या स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फाॅर्मची लिंक मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरला रात्री १२ वाजतापर्यंत स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना आपले नाव नोंदवता येणार आहे. स्पर्धकांना स्वत:च्याच सामुग्रीचा उपयोग करावा लागणार आहे.
----------
बॉक्स...
कोरोना नियमांचे होईल पालन
स्पर्धेत जय-पराजयाचा निर्णय मनपा आयुक्तांचा असेल. कोरोना संक्रमण बघता नियमांचे पालन करावे लागेल. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा लागेल.
..........