लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.जगात एक कोटी म्हणजे २५ टक्के लोक उच्चरक्तदाबाने पीडित आहे. ‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग’नुसार दरवर्षी जगात या आजारामुळे ७५ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २३.१ टक्के पुरुष तर २२.६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत. भारतात या आजाराचे १३ कोटी ९० लाख रुग्ण आहेत. यामुळे आता या आजाराची नोंदही ठेवली जात आहे. ‘फिट’कडून ‘अनफिट’कडे आपण जात असल्याने या आजाराचे रुग्णही वाढताना दिसून येत असल्याचे हृदयरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ‘बैठी जीवनशैली’ही याला कारणीभूत आहे. ज्यांचे ‘फिटनेस’ कमी आहे, त्यांच्या हृदयाचे मसल जाड. यामुळे सुरुवातीपासून मीठ कमी खा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टीमंध्ये सातत्य ठेवल्यास याचा परिणाम दिसून येत असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जीवनशैलीतील बदल काळाची गरज-डॉ. जुनेजा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष जुनेजा म्हणाले, उच्च रक्तदाबामुळे हृदयातील धमन्यांचे आजार (हृदयात ब्लॉकेजेस तयार होणे), मायोकार्डिअल इन्फ्रॅक्शन (हार्ट अटॅक) आणि कार्डिओमायोपथी (हृदयाची स्पंदने मंदावणे) अशा समस्या उद्भवू शकतात. यातून मेंदूचा झटका (पक्षाघात), मूत्राशयाचे नुकसान (नेफ्रोपथी), डोळ्यांची दृष्टी कमी होणे (रेटिनोपथी), ‘ब्रेन हॅमरेज ’ आदी आजार होण्याचा धोका असतो. हे सर्व आजार केवळ जीवनपद्धतीत बदल आणून टाळता येऊ शकतात. जीवनशैलीतील बदल ही काळाची गरज आहे.रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक-डॉ. जगताप प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, अनेक व्यक्तींना आपल्याला ‘हायपर टेन्शन’चा त्रास आहे हेच माहीत नसते. सुदैवाने नियमित रक्तदाब तपासणी करून हे जाणून घेता येते आणि ते अगदीच सोपे आहे. यासाठी लागणारे यंत्र बाजारात कमी दरात उपलब्ध आहे. ‘बीपी’ मोजण्याच्या अर्ध्या तासापूर्वीपर्यंत कॉफी व सिगारेट टाळायला हवे. ‘रिलॅक्स’ होऊन व बसूनच बीपी घ्यायला हवे. आपल्याकडे लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. परंतु केवळ १५ टक्के लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताची शक्यता वाढते. एवढंच नाही तर डोळे, किडनी, यकृत तसंच नर्व्हस सिस्टमवरही परिणाम होतो. म्हणूनच उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवायला हवे.रोजच्या रोज व्यायाम आवश्यक-डॉ. संचेती हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करायला हवा. दररोज कमीतकमी अर्धा तास योग्य प्रकारचा व्यायाम केल्याने यावर नियंत्रण मिळवता येते. यात पायी चालण्याचा व्यायाम सर्वात सोपा आणि परिणामकारक आहे. सुरुवातीला ३० मिनिटांमध्ये तीन ते चार किलोमीटर चला, नंतर यात वाढ करा. साधारण ४५ मिनिटांत पाच किलोमीटर अंतर चालण्याचे लक्ष्य ठेवा. तसेच रोजच्या जीवनशैलीत बदल केल्यास आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते. विशेषत: खाण्यात मिठाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिल्यास हा आजार दूर ठेवता येतो.
प्रत्येक नवव्या व्यक्तीला हायपरटेन्शन : जिल्ह्यात ८८२३ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:58 PM
भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देकेवळ १५ टक्केच लोकांचे रक्तदाब नियंत्रणात