लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - संमोहित करून लुटणाऱ्या टोळीने दोन दिवसात पुन्हा दुसरा एक गुन्हा केला. यावेळी त्यांनी यशोधरानगरातील महिलेला बँकेत नेण्याच्या बहाण्याने ऑटोत बसवून तिच्या गळ्यातील दागिने काढून घेतले.
बिनाकी मंगळवारी येथील रहिवासी गीताबाई नथूलाल हारोडे (वय ४५) या शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास धान्य आणण्यासाठी घरून निघाल्या. कांजी हाऊस चाैक ते विटा भट्टी चाैकाजवळ त्यांना एका अल्पवयीन मुलाने (अंदाजे १५ वर्षे वय) थांबवले. मला बँकेत पैसे जमा करायचे आहे, बँक कुठे आहे दाखवा, असे म्हटले. लगेच एक महिला आणि पुरुष तेथे आला आणि मुलाला बँक दाखवा, त्याला पैसे जमा करायचे आहे, असे म्हणत गीताबाईला एका ऑटोत बसवले. धावत्या ऑटोत गीताबाईंना आरोपींनी गप्पात रंगवून संमोहित केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील पावणेदोन लाख रुपये किंमतीचे दागिने काढून पिशवीत घातले आणि ऑटोमोटीव्ह चाैकात आरोपी उतरले. तुम्ही विनोबा भावे गेटजवळ थांबा, आम्ही मागून येतो असे म्हणून गीताबाईंना समोर पाठवले. बराच वेळ वाट पाहूनही आरोपी आले नाही. त्यामुळे गीताबाईंनी जवळची पिशवी बघितली असता त्यात दागिने आढळले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गीताबाईंनी यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----
कळमन्यासारखीच घटना
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा तशीच घटना आता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या गुन्ह्यातील आरोपी आणि एकूणच घटनाक्रमाचे साम्य लक्षात घेता हे एकाच टोळीने हे दोन्ही गुन्हे केले असावे, असा संशय आहे.
-----