लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेलनेस सेंटरच्या नावाखाली एम्प्रेस मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे हे रॅकेट चालविणाऱ्या चारपैकी एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्यांच्याकडे देहविक्रय करणारी एक नेपाळची आणि छत्तीसगडमधील दुसरी तरुणी पोलिसांच्या हाती लागली.एम्प्रेस मॉलमधील पहिल्या माळ्यावर आरोपी मनीष लांजेवार आणि ढेरेक मंचेडो या दोघांनी फिनिक्स वेलनेस (मसाज) सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल कुंटणखाना सुरू केला होता. त्याची माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एसएसबीचे निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक प्रीती कुळमेथे, हवलदार योगेश घोडकी, संजय पांडे, मनोजसिंह चौहाण, प्रल्हाद डोळे, अनिल दुबे, कल्पना लाडे, सुरेखा, छाया, तसेच दीपिका दोनोडे, सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर, राणी कळमकर यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी छापा मारला. पाच हजारात नेपाळी महिला उपलब्ध करून दिल्यानंतर आरोपी मनीष तसेच ढेरेक मंचेडो आणि त्यांच्यासाठी मॅनेजर म्हणून काम करणारी तनवी महेंद्र चोटलिया (वय २१, रा. गिट्टीखदान) हे तिघे पळून गेले. पोलिसांनी नेपाळी महिला (वय ३८) आणि भिलाई (छत्तीसगड) मधील तरुणीला (वय २४) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नंतर मुक्तता करण्यात आली. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या मनीष, ढेरेक, तनवी आणि फैयाजविरुद्ध गणेशपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मुंबईच्या दलालाचे नेटवर्कगुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी या संबंधाने पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचे नेटवर्क अनेक प्रांतात आहे. मुंबईचा फैयाज शेख ऊर्फ फैजान रहिस शेख हा या रॅकेटला देश-विदेशातील वारांगना पुरवितो. आधी हे रॅकेट सुंदर मुलींना मसाज थेरपिस्ट म्हणून आपल्या जाळ्यात ओढतात. नंतर ते त्यांना बक्कळ पैशाचे आमिष दाखवून देहविक्रय करवून घेतात. देहविक्रय करताना सापडलेली नेपाळी महिला दिल्लीला राहते. तिचा पती तेथे नोकरी करतो तर ही ठिकठिकाणी जाऊन वेश्याव्यवसाय करते.