नागपूर : निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाची ११ महिने चौकशी केली. यात त्यांनी अनेकांचे बयाण नोंदविले. यावर १४०० पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. चांदीवाल आयोगाच्या अहवालात मी कोठेही दोषी नसल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
चांदीवाल आयोगाने चौकशी केली असता अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहे. त्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. ज्या परमवीर सिंग यांना सहा वेळा समन्स काढून आयोगाने चौकशीसाठी बोलावले होते तरी ते आले नाही. शेवटी त्यांचा अटक वॉरंट काढण्यात आला. तेव्हा परमवीर सिंग यांनी जे आरोप केले होते त्यावर आयोगाला शपथपत्र लिहून दिले की, माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही. केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. तसेच सचिन वाझे याने आयोगासमोर जबाबात सांगितले की, अनिल देशमुख यांनी मला कधीही बार मालकाकडून पैसे गोळा करण्यासाठी सांगितले नाही. माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा आयोगाच्या चौकशीमध्ये समोर आला नाही. भलेही क्लीन चिट हा शब्द त्या अहवालामध्ये नसू शकतो. पण संपूर्ण चांदीवाल आयोगाच्या अहवालामध्ये मला कोठेही दोषी धरण्यात आले नाही. मी गेल्या दीड वर्षापासून १४०० पानांचा अहवाल हा जनतेसमोर आणण्याची मागणी भाजपा सरकारकडे सातत्याने करीत आहे. पण मुद्दामून भाजपा सरकार चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही. हा अहवाल जनतेसमोर येण्यासाठी मी कोर्टामध्येसुद्धा गेलो असल्याचे देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
त्याच बरोबर मुंबई उच्च न्यायालयाने माझ्यावरील आरोपांची ७ महिने केस चालली. त्यांनी जो निकाल दिला त्यात असे म्हटले आहे की, संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली असता व जबाब ऐकल्यानंतर त्यांनी निकालात म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे आढळून आले नाही व ते या प्रकरणात कोठेही दोषी दिसत नाही.