लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या पराभवाचे खापर थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर फोडणारे मध्य नागपूरचे उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांनी रविवारी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली. पटोलेंना संघाचे हस्तक म्हणून त्यांनी राज्यभर राजकीय खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे त्यांना निलंबनापूर्वी कारणे दाखवा नोटीसही प्रदेश काँग्रेसने बजावली आहे. यावर 'आपण नाना पटोलेंचे नव्हे तर राहुल गांधी यांचे सैनिक आहोत,' असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पटोले यांच्यावर पलटवार केला.
शेळके म्हणाले, मी नोटीसला उत्तर देणार आहे. ही नोटीस प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्याने आपणासही माध्यमांसमोर यावे लागले. आपलेही काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर अपेक्षित आहे. पटोले यांनी विदर्भासह महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले. त्यांच्या कारनाम्यांचे पुरावे राहुल गांधी यांच्याकडे देणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात संघाचे एजंट म्हणून त्यांनी भाजपला मदत केली असल्याचा आरोपही शेळके यांनी केला. मध्य नागपूरची जागा भाजपने जिंकावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्ष संघटना कमजोर केली. मला नोटीस बजावली असली तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. नाना पटोले आमचे नेते नाहीत तर राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि मी त्यांचा एक शिपाई आहे, असेही ते म्हणाले.
यादीतून नावही वगळले २०१९ मध्ये ४००८ मतांनी पराभूत झालो. २०२४ च्या निवडणुकीत प्रदेश कमिटीकडून पक्षाकडे ३ जणांची नावे पाठविण्यात आली. त्यातूनही माझे नाव वगळले. प्रियांका गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या तेव्हा शहर आणि प्रदेश काँग्रेसने ताकद लावली नाही. • माझ्यावर कारवाई झाली तेव्हा काँग्रेसचा कायदा सेल कुठे होता? असा सवालही शेळके यांनी यावेळी केला.