मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार
By कमलेश वानखेडे | Updated: December 6, 2024 18:04 IST2024-12-06T18:03:33+5:302024-12-06T18:04:45+5:30
Nagpur : नाना पटोले यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले

I am ready to resign and contest election on the ballot
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा मताचा अधिकार चोरला जात आहे, अशी जनतेची भावना आहे. ही प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे. यात निवडणूक आयोगाने सुधारणा करावी. मते चोरली जात असतील तर ही भूमिका मान्य करावी. मला आव्हान देणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेटवर पुन्हा निवडणूक घेणारे पत्र आणावे, मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांचे आव्हान स्वीकारले.
नाना पटोले शुक्रवारी नागपुरात पत्रकारांना म्हणाले, ईव्हीएमविरोधात आता जनताच आवाज उठवत आहे. मारकडवाडीत सरकारने मतदान का होऊ दिले नाही, कशाची भीती होती. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आवाजी मतदानाने निर्णय कायदे होत आहेत. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे. २२० लाख कोटींचे कर्ज मोदींच्या राज्यात झाले. काँग्रेसने आर्थिक व्यवस्था सांभाळली होती, असेही पटोले म्हणाले. राज्यसभेत नोटा मिळाल्या असतील तर सभापतींना कारवाईचे अधिकार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिंदे खूश आहेत का, हे त्यांचा चेहराच सांगतो आहे. त्यांचे चेहरे कसे आहेत यात आपल्याला पडायचं नाही. पण महाराष्ट्र प्रगत राज्य व्हावे, हे राज्य गुजरातकडे जाऊ नये, तर महाराष्ट्र सुसाट जावा. नवीन सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रतोद नियुक्तीसाठी अध्यक्षांना पत्र देणार
काँग्रेस पक्षाचा प्रतोद कोण असेल याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले जाईल. अधिवेशनापूर्वी हा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपांबाबत ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत पटोले यांनी अधिक बोलणे टाळले. शपथविधीचे निमंत्रण असते तर गेलो असतो. महायुती सरकारच्या शपथविधीचा निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्हाला बोलावले नाही, बोलावले असते तर गेलो असतो, असे पटोले यांनी स्पष्ट केले. फडणवीस मुख्यमंत्री झाले यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्र पुढे जावा, तरुणांना न्याय मिळावा, आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.