नागपूर : नोकरीत तणावात असलेल्या एका ऑटोमोबाईल शोरूमच्या अधिकाऱ्याने मुलीला नोटबुक खरेदी करून दिल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. मोहन अशोकराव दशपुत्रे (४६) असे मृताचे नाव असून, ते अयाचित मंदिर, महाल येथील रहिवासी होते.
प्राप्त माहितीनुसार, मोहन दशपुत्रे एका ऑटो शोरूममध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसापासून त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू होता. मोहन यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि नोटीस कालावधीत काम करीत होते. मोहनच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि आई-वडील आहेत. १४ जूनला मुलीने मोहनला नोटबुक खरेदी करायचे असल्याचे सांगितले. ते नोटबुक खरेदीसाठी मुलीला बाईकवर बसवून स्टेशनरी दुकानात गेले. तेथून त्यांनी नोटबुक खरेदी करून मुलीला दिले. मोहन यांनी मुलीला ‘मी तुला शेवटचे नोटबुक खरेदी करून दिले आहे’, असे सांगून ते बाईकवर स्वार होऊन घरून निघाले.
मोहनने म्हटलेले वाक्य मुलीने आईला सांगितले. पत्नीने मोहनच्या या वाक्याकडे सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष केले. रात्री १० वाजता वर्धा मार्गावरील स्टार बस डेपोजवळ मोहनने बाईकवर बसून विष प्राशन केले. त्यानंतर ते बाईकवरून खाली पडले. परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती मोहनच्या कुटुंबीयांना दिली. ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोहनला एम्समध्ये भरती केले. परंतु उपचारादरम्यान ते मृत पावले.
बेलतरोडी पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास करीत आहेत. मोहन कुटुंबात एकमेव कमावते होते. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.