- वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह : शास्त्रीय गायन, कथ्थक डान्स बॅले, बासरीची जुगलबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित ३० व्या स्व. डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्रीय गायन, कथ्थक डान्स बॅले आणि बासरीच्या जुगलबंदीचा आनंद रसिकांना घेता आला.
पहिल्या सत्रात प्रसिद्ध युवा गायक अनिरुद्ध देशपांडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग पुरीयाधनश्रीने गायनास सुरुवात केली. बडा ख्याल विलंबित एकतालमध्ये निबद्ध बंदिश ‘अब तो श्याम आये’ आणि त्यानंतर छोटा ख्याल द्रुत त्रितालमध्ये ‘सांज भई घर आये बलमा’चे सादरीकरण केले. ‘या भवनातील गीत पुराणे’ या नाट्यगीताने त्यांनी समारोप केला. दुसऱ्या सत्रात उज्जैन, मध्य प्रदेश येथील डॉ. पल्लवी किशन व त्यांच्या समूहाने कथ्थक डान्स बॅले सादर करत रसिकांचे नेत्र दिपवले. यात जान्हवी तेलंग, लोकेश सिंह तोमर, मेघावी शर्मा, आदितीसिंह जादौन, पलक मकवाना, ईशा व्यास, जयवी व्यास, रवीना परमार, जयति मालवीय, हीतल कोटवानी, अस्मि तिवारी, सलोनी मालाकार, सुहानी राजपूत, साक्षी चांद्रायण, पहल उपाध्याय हे सहभागी होते.
अंतिम सत्रात पं. प्रवीण गोडखिंडी व त्यांचे पुत्र शादज गोडखिंडी यांची बासरीवरील जुगलबंदी रंगली. राग पुरिया कल्याण विलंबित एकताल व द्रुत तीन तालमध्ये सादर केल्यावर त्यांनी राग हेमवती मधील बंदिश सादर केली.
---------
आज महोत्सवात
रविवारी १ ऑगस्ट रोजी समारोहाचा समारोप होणार असून, अखेरच्या दिवशी संपदा माने यांची नाट्यगीतांची मैफिल रंगणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता ऑनलाईन प्रदर्शित केला जाईल.
.............