नागपूर : ‘डॉ. बाबासाहेबांवर अन्याय झाला म्हणून त्यांनी धर्मपरिवर्तन केले होते. अन्याय झाला नसता तर त्यांनी धर्मांतरण केले नसते.’ या माझ्या वाक्याचा अनर्थ करत ‘बाबासाहेबांना बुद्ध धम्म स्वीकारायचा नव्हता’ असे वाक्य माझ्या तोंडी कोंबण्यात आले आणि सर्वत्र माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला आहे. मी कुठेही जाताना निळा झेंडा मान्य असेल तरच येतो, नाही तर जातो. मी बुद्धीस्ट आहे आणि माझा विरोध करणाऱ्यांनी विचार करणे आवश्यक असल्याची भावना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केली.रविवारी मारवाडी फाऊंडेशन नागपूरच्यावतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग शल्य चिकित्सक व कोवई मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटल कोईम्बतूरचे संचालक डॉ. प्रशांत वैजनाथ यांना रामदास आठवले यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार अजय संचेती होते तर व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निकुंज पवार, फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. आनंद संचेती, कीर्ती गांधी, महेश बंग, डॉ. मधुकर वासनिक आदी उपस्थित होते.
आपल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे रामदास आठवले यांनी भाषणाची सुरुवात ठमकेबाज कोटीयुक्त काव्यमय ओळींनी केली. डॉक्टरांना उद्देशून ‘आप लोगों को बचाते है, हम अपने अपोझिशन वालो को नचाते है’ असे वक्तव्य केले. तर भाजपाला उद्देशून ‘काही बाबतीत तुम्ही आम्हाला जम नाही. पण, तुम्हाला आमच्याशिवाय करमत नाही’ अशी कोटी केली. ‘मी तामिळनाडूला नेहमी येतो. पण, माझे हृदय बंद पडले नाही म्हणून तुम्हाला भेट नाही’ अशी विनोदी भावना त्यांनी डॉ. वैजनाथ यांना उद्देशून केली.
संविधान सगळ्यांनीच स्वीकारला असला तरी विचार आत्मसात करण्याची गरज असून आंतरजातीय विवाहांनीच समाजात एकजूटता येईल, अशी भावनाही रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखवली. डॉ. वैजनाथ यांच्यासाठी पद्म पुरस्कारसाठी मी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर परिचय डॉ. निकुंज पवार यांनी करवून दिला. संचालन स्मिता खनगई यांनी केले.वैद्यकीय क्षेत्रात कोटा नको तर गुणवत्ता हवी - डॉ. वैजनाथदेशात वैद्यकीय क्षेत्रात खासगी हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, यात कोटा सिस्टम घातक ठरत असून मेरीटनुसारच प्रवेश देणे गरजेचे आहे. आता धार्मिक आणि जातीय समीकरणाच्या पलिकडे जाऊन विचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रकाश वैजनाथ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.