नागपूर - ‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला पुर्णत: मान्य नाही. जे ‘ओल्ड’ आहे आणि काहीच कामाचे नाही, ते भंगारात काढावे आणि जुन्यातील जे उपयुक्त असे ‘गोल्ड’ आहे, ते स्विकारावे, अशा विचारांचा मी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
रविवारी पर्सिस्टंटच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात हिंदू रिसर्च फाऊंडेशन व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने इस्त्रोचे शास्त्रज्ञ व ‘स्वदेशी लिक्विड इंजिन - विकास’चे संकल्पक व विकासक पद्मभूषण एस. नाम्बीनारायणन यांना ‘आचार्य भारद्वाज’ तर रसायन शास्त्रातील भिष्मपितामह पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘नागार्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नितीन गडकरी भारतीय इतिहास, विज्ञान आणि आधुनिक संशोधन यावर बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू काँग्रेसचे संस्थापक व अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद होते तर व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसुदन पेन्ना, मंगलयान (मार्स ऑर्बिट मिशन - एमओएम)चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. एस. अरुणन, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक व हिंदू रिसर्च फाऊंडेशनचे संयोजक डॉ. तुकाराम भाल उपस्थित होते.
प्राचीन भारतातील सर्वच गोष्टी उपयुक्त होते, असे नाही. परंतु, त्यातील जे उपयुक्त होते, त्यांवर संशोधन होणे आणि विकसित होणे गरजेचे आहे. त्यावर अनेकांनी संशोधन केले आहे. परंतु, ते जर सेफ डिपॉझिटमध्ये बंद असेल तर त्याचा काय उपयोग. ते बाहेर आले पाहिजे आणि नव्या पिढीकडे हस्तांतरित झाले पाहिजे. शिवाय, होत असलेले नवे संशोधन केवळ कागदावर असून कामाचे नाही तर ते प्रमाणित झाले तरच त्याचा उपयोग होणार असल्याचे गडकरी म्हणाले. डॉ. माशेलकर यांचे हळद पेटेंट मिळविण्याविषयीचा संघर्ष आणि एस. नाम्बीनारायणन यांनी स्वस्त आणि परवडेल अशी रॉकेट यंत्रणा निर्माण केले. ते संशोधकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. स्वस्त, परवडेल, उपयुक्त ठरेल आणि त्याचा लाभ देशाला होईल, असे संशोधन होणे ही काळाची गरज आहे. इस्त्रोने सॅलाईटसाठी जी लिथियम बॅटरी वापरली, त्याचा उपयोग देशाच्या परिवहनासाठी का होऊ नये, असा विचार करणे अभिप्रेत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अनिता तिडवे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. तुकाराम भाल यांनी केले.
हिंदुत्त्वाला सेक्युलर राजकारणाने संकुचित केले
हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला. गेल्या सरकारांनी समाजाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केले. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आहे. परंतु, सेक्युलर नावाच्या धर्मनिरपेक्ष अर्थाने हिंदुत्त्वाला संकुचित करण्याचे षडयंत्र राबविले. प्रतिमा विरूद्ध वास्तविकता, असा हा संघर्ष होता, असेही गडकरी यावेळी म्हणाले.