- बालाजी देवर्जनकर
नागपूर : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो. इच्छुकांचे मात्र सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. श्रेष्ठींनी अनेकांना काम करा, पाहू या असा मेसेज दिल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून स्वत:चे अस्तित्व पणाला लावून आहेत.
नागपुरात अनेकांना आमदार व्हायचंय. तुम्ही म्हणाल नेमके इच्छुक कोण? गुडघ्याला बाशिंग बांधलेले कोण? कर्तव्यदक्ष कोण? अपेक्षा ठेवून असणारे किती? असा शोध घेतल्यानंतर आता अधिकाधिक नगरसेवकांनाच आमदार व्हायचंय दिसून येतेय. कारण, इथले अनेक नगरसेवक आजवर आमदार बनलेत. त्यांनी तसे कर्तृत्वही गाजवलेय! आता मुद्दा हा आहे की पक्ष तिकीट किती जणांना देणार? तिकीट मागणाऱ्यांची ही जंत्री केवळ भाजपातच नाही तर काँग्रेस, शिवसेनेसह बसपातही आहे.
काँग्रेसवाल्या नगरसेवकांनीही आता नगरसेवक ते आमदार प्रवास केलेल्या आमदारांचा आदर्श घेत आपणही तिकीट मागितले तर हरकत काय? असे म्हणून आपल्या नावाचा श्रेष्ठींच्या दरबारात गाजावाजा सुरू केला आहे. निवडून येण्याची तशी प्रत्येकालाच शंभर टक्के शाश्वती असते. हाच विश्वास मनात धरून मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाच्या नगरसेवकांना निदान ‘लाटे’चा तरी आधार मिळेल पण, इतरांचे काय? अशीही भीती दुसरीकडे या इच्छुकांच्या मनात आहे. त्यातही काहींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केलाय तर काहींनी इच्छा असूनही आमदारांची नाराजी नको म्हणून उमेदवारीसाठी दावा करण्याचे टाळले आहे.
नागपुरातील पाच मतदारसंघात भाजपा इच्छुकांची संख्या अमाप आहे. पण, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिममध्ये कुठलाच इच्छुक पुढे आलेला नाही. नाव समोर करणारा कुणीच दिसत नाही. इच्छा असूनही कुणी इच्छा व्यक्त करण्यास इच्छुक दिसत नाही. शिवसेनेची नागपुरात भाजपाइतकी ताकद नाही. बसपाचे महापालिकेतच काहीसे अस्तित्व आहे. बाकी ‘भाजपा’राज आहे. असो काही...आचारसंहिता लागायची आहे. इच्छुकांच्या मनात धाकधूक आहे. पण, नेत्यांशी असलेली जवळीक पाहता अनेकांना सध्यातरी आमदार झाल्यासारखं वाटतंय. तसे ‘मायक्रो प्लानिंग’ इच्छुक करताना दिसत आहेत.