हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला; पण फडणवीस म्हणाले, मी असतो तेव्हा...; अजितदादांचा भन्नाट किस्सा

By संजय तिपाले | Published: July 17, 2024 04:05 PM2024-07-17T16:05:26+5:302024-07-17T16:08:09+5:30

अजित पवारांनी सांगितला हेलिकॉप्टर प्रवासातील किस्सा: भरसभेत फडणवीसांनाही हसू आवरेना

I felt a lump in my stomach, I was calling Panduranga's name, but Fadnavis said, don't worry... | हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला; पण फडणवीस म्हणाले, मी असतो तेव्हा...; अजितदादांचा भन्नाट किस्सा

I felt a lump in my stomach, I was calling Panduranga's name, but Fadnavis said, don't worry...

गडचिरोली : गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जाताना नागपूरपर्यंत ठीक वाटले, पण नंतर हेलिकॉप्टर ढगात शिरले,  इकडं पाहतोय ढग, तिकडं पाहतोय ढग, जमीन दिसेना, झाडंही दिसेना... पोटात गोळा आला, आज आषाढी एकादशी... पांडुरंगा, पांडुरंगा असे नाव घेत होतो, पण देवेंद्र फडणवीस हे काळजी करु नका... असे उपदेश देत निश्चिंत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किस्स्याने भरसभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले.

त्याचे झाले असे, १७ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री द्वयींचा नियोजित गडचिरोली दौरा होता. अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रा.लि. कंपनीच्या दहा हजार कोटी गुंतवणुकीच्या स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पार्थ पवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत व पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने निघाले, पण सकाळपासूनच गडचिरोलीत आकाशात ढग दाटून आले होते.

सकाळी ११ वाजेच्या ठोक्याला सरीही बरसल्या. खराब वातावरणामुळे फडणवीस व पवार हे कार्यक्रमास येतील की नाही, अशी काळजी वाटत होती, असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासातील किस्सा सांगितला. हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर बाहेर काहीच दिसत नव्हते, फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते. मी त्यांना म्हणालो, अहो, बाहेर काहीच दिसत नाही, आपण ढगात चाललोय की आणखी कुठं चाललोय काही कळेना, त्यावर ते म्हणाले, माझे सहा अपघात झाले आहेत, मी जेव्हा विमानात असतो, तेव्हा अपघात झाला तरी मला काही होत नाही. माझ्या नखालाही धक्का लागलेला नाही, त्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका... यावर भर सभेत हशा पिकला, तर मंचावर उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. 

राजकीय प्रवासाची सुरुवात गडचिरोलीतूच
दरम्यान, वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी होत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवा राजकीय पट मांडला होता. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गडचिरोलीत पहिल्यांदाच एकत्रित येऊन जाहीर सभेला संबोधित करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. गडचिरोली दौऱ्यातील गंमतीदार किस्सा सांगून अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत सुरक्षित प्रवास सुरु असल्याचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Web Title: I felt a lump in my stomach, I was calling Panduranga's name, but Fadnavis said, don't worry...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.