नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीयपासून ते खासगी हॉस्पिटलमधील बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी लस घेतली. आता दुसऱ्या टप्प्यात इतरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. १०० टक्के लसीकरणासाठी ‘आयएमए’ने पुढाकार घेत ‘मी कोरोनाची लस घेतली, तुम्ही घ्या..’ असे आवाहन करीत शनिवारी जनजागृती रॅली काढली. यामध्ये कॅन्सरबाबत जागरूक राहण्याचेही आवाहन करण्यात आले. रॅलीमध्ये सायकल व व्हिन्टेज वाहनांचा समावेश होता.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर शाखेच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमएच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी डॉ. अशोक अढाव, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. अशोक अरबट, तारिक रझा, दीपिका चांडक, जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, डॉ. अमित समर्थ, अनिरुद्ध, डॉ. राजन बारोकर, डॉ. शांतनु मुखर्जी, डॉ. निंबोरकर, डॉ. सचिन गाठे आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी ठाकरे सहभागी झाले होते. रॅली शंकरनगर चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, छत्रपतीनगर चौक, लोकमत चौक, झाशी राणी चौक होऊन ‘आयएमए’मध्ये आली. रॅलीमध्ये लसीकरणाच्या व कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान करण्याचे आवाहन करणारे फलक हाती घेण्यात आले होते.