लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महोत्सवाच्या औपचारिक उद््घाटनानंतर आरजे गौरवच्या माध्यमातून जग्गू दादा व अनिल कपूरच्या गप्पांचा फड रंगला. अनिल म्हणाला, जग्गू दादाच्या कपडे व त्याची स्टाईल मला आवडायची. माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला जाण्यासाठी मी त्याचे कपडे वापरायचो. पुढे सिनेमाच्या प्रवासात माझे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. तेव्हा ‘विरासत’ या चित्रपटात त्याची कार्गोची पॅन्ट मी वापरली. सुदैवाने माझा चित्रपट हिट झाला. तेव्हापासून ती पॅन्ट माझ्यासाठी लकी वाटते. त्यामुळे २५ वर्षापासून ती माझ्याकडेच असल्याचा खुलासा अनिलने केला. यावर जग्गू दादाने, ‘लोग ताबिज या धागा बांधते है, इसने दोस्त का पॅन्ट संभाल के रखा है’ असे म्हणून हंशा पिकविला.मोठा कोण, या प्रश्नावर भिडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या जग्गू दादाने ‘भिडू’ या पालुपदानेच सुरुवात केली. ‘चित्रपटात अनिल नेहमी लहान भावाच्या भूमिकेत होता, पण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. त्याच्या फिटनेसमुळे तो लहान वाटतो. चित्रपटात मी राम व तो लखन असला तरी आयुष्यात व मार्गदर्शनातही तो राम आहे.’ असे जॅकी म्हणाले. अनिलनेही आठवणी उलगडल्या. जग्गू दादाशी माझी अभिनयाच्या आधीपासून मैत्री आहे. माझी पत्नी सुनिता व जॅकीची पत्नी आयशा ४५ वर्षापासून मित्र आहे. त्याला पाहून आजही मी हळवा होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. आम्ही डझनभर चित्रपटात एकत्र काम केले. यानंतर जॅकीने त्याच्या शैलीत मला ‘भिडू अपने को एक पिक्चर और करना चाहिऐ’ असे म्हटले. २०१९ मध्ये आमचा एक चित्रपट येणार असल्याचे अनिलने यावेळी सांगितले. स्टारडमबाबत विचारल्यावर जॅकी म्हणाला, आयुष्यात कधी विचार करून काम केले नाही. जे येत गेले ते स्वीकारत गेलो आणि जे नाही मिळालं ते विसरत गेलो. फकिराप्रमाणे फिरलो, झोळीत जे मिळाले ते घेतले व वाटले. आपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणा असायला हवा. ‘काम के बारे मे पॅशनेट होना चाहिए भिडू’ असा संदेश त्याने दिला.या दोघांच्या गप्पामधील विनोद, आठवणींचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. शेवटी अनिलने ‘माय नेम इज लखन...’ या गीतावर सिग्नेचर डान्स करीत दोघांनीही प्रेक्षकांचा निरोप घेतला.‘दुनिया ने हमसे सिखा है, और हम सिखाते रहेंगे’सुरुवातीला कर्माच्या गीतामुळे भारावलेल्या अनिल कपूरने देशाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. तो म्हणाला, आम्ही कामासाठी जगभरात फिरतो, पण भारतासारखा देश जगात कुठेही सापडणार नाही. येथील संस्कृती, कौटुंबिक मूल्य, सामाजिक सभ्यता जगासाठी प्रेरक आहेत. ‘दुनिया ने हमसे सिखा है और हम आगे भी सिखाते रहेंगे’ असे भावोद्गार त्यांनी काढले.