अमित शहांना भेटलोच नाही, १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडत नाही - अजित पवार
By कमलेश वानखेडे | Published: April 16, 2023 05:40 PM2023-04-16T17:40:49+5:302023-04-16T17:41:35+5:30
अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जावून सत्ता स्थापन करतील, अशा चर्चा उठल्या असताना अजित पवार यांनी मात्र, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी मुंबईत आले असता आपली त्यांच्याशी भेट झालीच नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयााने १६ आमदारांना अपात्र ठरविले तरी आकड्यांचे गणित पाहता सरकार पडत नाही. त्यामुळे ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
वज्रमुठ सभेसाठी रविवारी सकाळी अजित पवार हे नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटीबाबत विचारणा केली असता भेट कुठे झाली, केव्हा झाली, अशी उलट विचारणा त्यांनी केली. मी कालच येणार होतो. पणसभा रविवारी सायंकाळी असल्यामुळे मी सकाळी पोहचण्याचा निर्णय घेतला. रात्री मुंबईला गेलो नव्हतो. मी पुण्यातच ‘जिजाई’ या माझ्या घरीच होतो.
या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. त्यात काह तत्थ्य नाही. कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचे काम इतरांनी व मिडियानेही करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्भषरापासून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्हाचा निकाल दिला. सर्व वकिलांनी आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. सगळा महाराष्ट्र या निकालाकडे लक्ष ठेवून आहे.
अजितदादांनी मांडल बहुमताचे गणित
अजित पवार म्हणाले, भाजपकडे स्वत:चे १०९ व अपक्ष ६ सहा असे एकूण ११५ आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आहेत. हे एकूण १५५ होतात. पुन्हा बच्चू कडू, रवी राणा असे एकूण १० सोबत आहे. हे सर्व १६५ होतात. १६ अपात्र झाले तरीदेखील आकडा १४९ राहतो. मॅजिक फिगर १४५ ची आहे. कारण नसताना वावड्या उठविण्याचे काम सुरू आहे. २८८ मधून १६ कमी झाले तरी एकूण २७२ आमदार उरतात. त्यावेळी बहुमतासाठी १३७ लागतील.
त्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुणाबद्दल गैरसमज पसरविण्याचे काहीच कारण नाही, असे गणितही पवार यांनी मांडले. मी मटक्यांचे आकडे थोडीच मांडतो आहे. विधानसभेतील आमदारांचे आकडे मांडत आहे. एवढ्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे उगाच ढगात गोळ्या मारण्यात काहीच अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.