लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक माझ्या रक्तात आहे. मी जागा असेल वा झोपलेला डोक्यात विचार नाटकाचाच सुरू असतो. नाटकाप्रतिच्या समर्पणामुळेच ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकासाठी मला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या आनंदात नागपुरातील जीवाभावाच्या मंडळींनी माझा मोठा सत्कारही घडवून आणला. यासाठी मी कायम त्यांच्या ऋणात राहील. पण, पुरस्कार आणि सन्मानाचे वलय दुसऱ्याच दिवशी मागे सोडून मी पुढे निघालोय. नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रूपेशने त्याच्या कल्पनेतील नाटकाच्या प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन घडवले. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असलेल्या रूपेशच्या डोक्यात नाटक नावाचे हे खूळ शिरले कसे, याचीही एक वेगळी संहिता आहे. हा मूळचा हिंदी भाषिक़ वडील पोलिसात असल्याने सारखी फिरस्ती सुरू असायची. केळवदच्या आदर्श विद्यालयात पाचवीत असताना कथाकथनातून पहिल्यांदा नाटक गवसले. पुढे नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात प्रवेशानंतर याच नाटकाच्या प्रेमापोटी राष्ट्रभाषा परिवाराशी रूपेश जुळला आणि नाटकमय झाला. तेव्हा त्याचा भर अभिनयावर होता. पण, प्रेमचंद, किस्मत चुगताई, मंटो, खुशवंत सिंग सलग वाचत आल्याने रूपेशच्या आतही एक लेखक आकार घ्यायला लागला होता. ‘कर्फ्यू’ मंचावर आले आणि त्याच्या आतील लेखकावर शिक्कामोर्तब झाले. यातूनच पुढे चार मोठे नाटक १४ एकांकिका लिहून काढल्या. वर उल्लेखित लेखकांचा प्रभाव असल्याने संहितेला अगदी निसर्गत: विद्रोहाचे आवरण लाभत गेले. रूपेशचा शब्दांवर विश्वास नाही, कारण शब्द फसवे असतात. फसवत नाहीत त्या भावना. म्हणूनच रूपेशची संहिता सलग नसते. तो केवळ आऊट लाईन ठरवतो आणि पात्रांना भूमिकेशी एकरूप करून त्याला जे सांगायचे आहे ते भावनांच्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याचा हा फॉर्म्युला आतापर्यंत तरी यशस्वी ठरलाय आणि मानवी मनात भावनांचा आवास कायम असेपर्यंत तो यशस्वीच ठरत राहणार आहे. सध्या काय आहे डोक्यात विचारल्यावर म्हणाला, एक कथा घोळतेय खरी. पण, त्याआधी कवितांना अभिनयाची जोड देऊन मंचावर आणायचेय. त्यासाठी झपाटल्यागत फिरतोय. रूपेश आणि झपाटलेपणाला नाटकाने हे असे एकरूप करून टाकले आहे.
पुरस्कार, सन्मान मी दुसऱ्याच दिवशी मागे सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:22 AM
नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले.
ठळक मुद्देरूपेश पवारनाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य