लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकच जण जगण्यासाठी आणि आप्तांना जगवण्यासाठी धडपडतो आहे. कदाचित जगण्याचे मोल कळायला लागले आहे. म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची नोंद झाली. असाच प्रसंग नागपुरात कालपरवा अनुभवास आला. स्वत: मृत्यूशय्येवर असतानाही दुसऱ्याच्या जगण्याची चिंता असणारे नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड तरुणासाठी रिकामा केला आणि दुसऱ्याच दिवशी गतप्राण झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या नारायणराव दाभाडकर यांच्यात समाजकार्याच्या संस्काराचे मूळ अखेरपर्यंत अडिग राहिले. ८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते. शिवाय, घरातील सगळीच मंडळी संक्रमित असल्याने अडथळ्यांचा पहाड होताच. अखेर २२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. स्वत: ॲम्बुलन्समध्ये बसून नारायणराव हॉस्पिटलला गेले. एक्स-रे काढल्यावर संक्रमण धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत उपचार सुरू झाले आणि खिडकीजवळचा बेड त्यांना मिळाला. बेडवर येत नाही तोच, त्यांना खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले. काही क्षण विचार केला आणि लागलीच जावयांना बोलावले. माझे वय ८५, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि मी माझे जगणे जगलो आहे. आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे. तेव्हा हा बेड रिकामा करतो आणि घरी जाऊया... असे ते उच्चारले. जावई एकदम हक्काबक्का झाले. घरी फोन केला तर सगळेच अचंबितही झाले. डॉक्टरांपुढे नारायणरावांची ही भावना व्यक्त केली तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे कर्तव्य व्यक्त केले. मात्र, नारायणराव ऐकायला तयार नव्हते आणि मी बेड रिकामा करत असल्याचे लिहून देत असल्याची घोषणा केली आणि लिहूनही दिले. ॲडमिट झाल्याच्या अवघ्या दोन तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला. घरी परतले. दुसऱ्या दिवशी अर्थात २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला. एखाद्या कौटुंबिक सिनेमातील, नाटकातील साजेसा हा प्रसंग प्रत्यक्षात दाभाडकर कुटुंबात घडला. कोणत्याही वयातील व्यक्ती जिथे जगण्यासाठी दुसऱ्याचे जीव घेण्यास तत्पर असतो, तिथे स्वत:ची पूर्णाहुती झाल्याचा साक्षात्कार व्हावा, हा एक संदेशच आपल्या कृतीतून नारायणराव दाभाडकर यांनी दिला आहे.
बाबांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला तणाव देणारा होता. मात्र, त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून एक संस्कार दिला, याची जाणीव तत्क्षणी झाली आणि आम्ही त्यांच्या त्या निर्णयाचे स्वागत केले. खऱ्या अर्थाने बाबा चिरंजीवी ठरले.
- आसावरी दाभाडकर कोठीवान