नागपूर : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिल्लीतील ‘पुतिन’ या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना, त्यांनी भाजप नेत्यांना आणखी एक चिमटा काढला आहे. मी पंतप्रधान मोदींना हिटलर नव्हे, तर पुतिन म्हटले. भाजपच्या लोकांना त्यांच्या नेत्यांची स्तुतीदेखील ऐकायला आवडत नाही. पुतिन हे स्वत:च्या देशासाठी शत्रूंशी लढत आहेत. ते मला आवडतात. मुळात मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, परंतु भाजपच्या लोकांना ते आवडलेले दिसत नाही, असे राऊत म्हणाले. गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
मी मोदींवर व्यक्तिगत नव्हे, तर केंद्र सरकारवर टीका करतो. सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. आता जे चाललं आहे, त्याला राजकारण नाही, तर बदल्याची भावना म्हणतात. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. असेच सुरू राहिल्यास शिवसैनिकांच्या वाहनांवर व वडापावच्या गाड्यांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे राऊत म्हणाले. देशातील इतर राज्यांमध्येही राज्यपाल आणि ईडीची कार्यालये आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सरकारांनाच का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
हिजाब नव्हे, महागाई महत्त्वाची समस्या
इंधन दरवाढीवरूनही राऊत यांनी केंद्रावर टीका केली. भाजपच्या नेत्यांना हिजाब हा मोठा प्रश्न वाटतो. प्रत्यक्षात हिजाब नव्हे, तर महागाई आणि बेरोजगारी या देशातील मोठ्या समस्या आहेत, असेही ते म्हणाले.
विदर्भाला लवकरच आणखी एक मंत्रीपद
मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या संजय राठोड यांच्याजागी विदर्भातील काही नेत्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांना भव्य निरोप
शिवसेना संपर्क मोहिमेसाठी राऊत यांनी तीन दिवस जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. गुरुवारी रात्री ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्या आगमनापेक्षा त्यांना निरोप देण्यासाठी शिवसैनिकांची जास्त गर्दी होती. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोपींवर कारवाईची वेळ आली की दिलासा कसा मिळतो ?
परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी भाष्य केले. हा राज्य सरकारला धक्का नाही, तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. ज्यावेळी राज्य सरकार तथ्यांच्या आधारावर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची कारवाई करण्याच्या भूमिकेत असते, तेव्हाच अशा प्रकारचे दिलासे मिळतात. असा दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा मिळतो, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्र पोलीस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत, असा ठपका कसा काय ठेवला जाऊ शकतो. महाराष्ट्र पोलीस देशातील सर्वात जास्त निष्पक्ष पोलीस आहेत. महाराष्ट्राच्या विरोधात खूप मोठे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप राऊत यांनी लावला.