निशांत वानखेडे
नागपूर : हेल्मेट घालूनच गाडी चालविण्याचे आवाहन करणारे बॅनर हातात घेऊन उभी असलेली एक व्यक्ती काेणत्याही चाैकात तुम्हाला दिसेल. ती व्यक्ती केवळ जनजागृतीसाठी नाही, तर स्वत:च्याा आयुष्याचे भयावह सत्य सांगण्यासाठी उभी असते. हेल्मेट न वापरता गाडी चालविण्याची छाेटीशी चूक केली आणि झालेल्या अपघाताने मृत्यूच्या दाढेत लाेटले. दाेन महिने काेमात, एक महिना व्हेंटिलेटरवर व वर्षभर अंथरूणात गेले. आजही बराेबर चालता व बाेलता येत नसलेली ही व्यक्ती ‘हेल्मेटशिवाय गाडी चालवू नका’, अशी कळकळीची विनंती करते. तेही तब्बल १६ वर्षांपासून.
ही व्यक्ती आहे संजय गुप्ता. त्यांच्याच भाषेत, ‘जिंदगी कभी भी किसी को दुसरा मौका नही देती, लेकीन मुझे किस्मत से दूसरी जिंदगी मिली है !’ मी जी चूक केली ती इतरांनी करू नये व जीवन संकटात लाेटू नये. गुरुवारी रहाटे काॅलनी चाैकात बॅनर घेऊन उभे असलेल्या संजय गुप्ता यांनी १८ वर्षांपूर्वीची ‘आपबिती’ सांगितली.
- मृत्यूच्या दाढेत नेणारा ताे दिवस
संजय गुप्ता एका फार्मा कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत हाेते. वय हाेते अवघे २७ वर्षे. १७ फेब्रुवारी २००४ ची ती घटना. दिवसभर डॉक्टरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर संध्याकाळी ते घरी जायला निघाले. अंधार पडला असल्याने डोक्यावरचे हेल्मेट काढून गाडीला टांगले आणि घराची वाट धरली. घाईगडबडीत ते गाडीचे साईड स्टँड काढायला विसरले. वाडी नाक्याजवळ एका वळण मार्गावर स्टँड रस्त्याला अडकल्याने ते गाडीसह पडले. डोक्याला जबर मार लागला आणि रस्त्याच्या कडेला ते बेशुद्ध हाेऊन पडले. काही तासांनंतर घरून फाेन आल्यानंतर कुणीतरी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. काही वेळात त्यांचे वडील आणि मित्रांनी रुग्णालयात नेले. हालचाल बंद हाेती, डॉक्टरांनीदेखील हात वर केले होते. सर्वांनी आशा साेडली; पण वडिलांनी दुसऱ्या रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी ऑपरेशन तर केले, पण फार शक्यता नसल्याचेही सांगितले. अशाच अवस्थेत तब्बल दोन महिने कोमात राहिल्यानंतर ते शुद्धीवर आले. पुढे एक महिना व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर धाेक्यातून बाहेर आले. चमत्कारिकरीत्या त्यांचा दुसरा जन्म झाला.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर वर्षभर पूर्ण पॅरालिसिसमुळे अंथरूणावर खिळले हाेते. त्यानंतर हालचाल सुरू झाली, पण लहान मुलांप्रमाणे रांगत हाेते. आठवण शून्य हाेती. पुन्हा पूर्वीसारखी पहिली ते बारावीपर्यंत पुस्तके वाचली. आपल्याला बरे करण्यात व ही प्रेरणा देण्यात वडिलांप्रमाणे डाॅ. चंद्रशेखर डाेईफाेडे यांचे माेठे याेगदान आहे, असे ते म्हणाले.
१६ वर्षांपासून दरराेज तीन तास जागृती
वर्षभर उपचार घेतल्यानंतर त्यांनी एक मोहीम हाती घेतली. सुरुवातीला व्हीलचेअर किंवा काठीच्या मदतीने चाैकात बॅनर घेऊन उभा राहायचे. बराेबर बाेलता येत नव्हते. काही लाेक टिंगल करायचे. काही मूर्ख समजायचे. मात्र, मी माझे कर्तव्य साेडले नाही. १६ वर्षे झाली, कुठल्या ना कुठल्या चाैकात जाऊन काही तास उभे राहून हेल्मेट घालण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात पाेलिस अधिकारी संजय सक्सेना, दीपाली मासिरकर व अनुपकुमार सिंह यांच्यासारख्यांनी खूप सहकार्य केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दिलीप वळसे पाटील यांचीही मदत झाल्याचे ते सांगतात.
शाळा-महाविद्यालयांत १७०० च्यावर व्याख्याने
एका चुकीमुळे आपण काय भाेगले, हे विद्यार्थ्यांना सांगण्याची मी विनंती केली. सुरुवातीला अनेकांनी नाकारले. मात्र, काहींनी सकारात्मकता दाखविली. अशाप्रकारे २००७ पासून आतापर्यंत विदर्भासह पुणे-मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी १७०० च्यावर व्याख्यानांत संजय गुप्ता यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी जनजागृती केली आहे.