नागपूर : चिठ्ठीद्वारे मुलाची हत्या करण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांचा हप्ता मागण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणी हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे.
गजानन जयपूरकर (वय ५९) हे रामेश्वरी रोडवर राहतात. त्यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. १९ डिसेंबर रोजी जयपूरकर यांना घरातील वृत्तपत्रात एका हत्येच्या वृत्ताचे कात्रण मिळाले. हे कात्रण १८ डिसेंबर रोजी वृत्तपत्राद्वारे पाठविण्यात आले होते. जयपूरकर यांनी त्याकडे गांभीर्याने घेतले नाही. ते कात्रणही फेकून दिले. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी जयपूरकर यांना घराच्या व्हरांड्यात एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीत मुलाची हत्या करण्याची धमकी देण्यात आली. त्या बदल्यात १५ लाख रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम एका ठिकाणी ठेवण्याचे व पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यात दिला होता. यासंदर्भात जयपूरकर यांनी गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी १९ डिसेंबरच्या घटनेच्या आधारे हॉकर्सला विचारपूस केली, परंतु त्यात त्याचा कुठलाही हात नसल्याचे पुढे आले. प्रकरणात जयपूरकर यांच्याजवळचा व्यक्तीच लिप्त असल्याचा संशय आहे. अथवा परिसरातील कुठला तरी व्यक्ती हे करीत आहे. जयपूरकर यांना ज्या स्थानावर पैसे ठेवण्यास सांगितले ते स्थानसुद्धा घराजवळच आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून, काही लोकं पोलिसांच्या नजरेत आहे. पोलिसांना आरोपी लवकरच ताब्यात येण्याची अपेक्षा आहे.