विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ मेजवानी देण्यात येते. मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग झाला. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रेशीमबागेत भेट दिली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते.
एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटलं होते. आता, मुख्यमंत्र्यांनीही येथील भेटीनंतर बोलताना माध्यमांना ही माहिती दिली. आज मी संघाचे मुख्य कार्यालयाला भेट दिली, तसेच हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेट दिली. येथे भेट दिल्यानंतर खूप छान वाटलं, एक वेगळीच उर्जा याठिकाणी मिळते.मी लहान असताना संघाच्या शाखेत आलेलो. त्यामुळे, यात काही राजकिय हेतू नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत, राजकारणात शिवसेना-भाजप युती आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीमबागेतील आपल्या भेटीनंतर दिले.
दरम्यान, २०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात येते. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. त्यामुळे संघभूमीत परत येत असताना सर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा होती. त्यानुसार, २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या वर्गाचे आयोजन संघाकडून करण्यात आले होते. त्यासाठी, सकाळीत अनेक आमदार आणि काही मंत्री रेशीमबागेत दिसून आले. मात्र, यादिवशी मुख्यमंत्री शिंदे तेथे नव्हते, त्यांनी आज संघ मुख्यालयात भेट दिली.