नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात आलेली वीजदराची सवलत पुढील पाच वर्षे संपणार नाही. भविष्यात मलाच संधी मिळणार असल्याने काळजी करू नये, असे सुचक विधान मुख्यमंत्र्यांनी आज केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) ५५ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे व्हीआयए-सोलर विदर्भ गौरव पुरस्कार-२०१८ समारंभ आयोजित केला होता. यावेळी व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी विदर्भ व मराठवाड्याला वीजदरात दिलेल्या सवलतीची मुदत मार्च-२०१९ मध्ये संपत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली.
या मागणीवर भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, अन्य राज्याच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगासाठी वीजदर कमी केले आहेत. ते छत्तीसगडच्या तुलनेतही कमी आहेत. वीजदर सवलतीची मुदत मार्च-२०१९ मध्ये संपत असली तरीही भविष्यात मलाच संधी मिळणार असल्यामुळे यापुढेही विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना देण्यात आलेली वीजदराची सवलत संपणार नाही आणि ती पाच वर्षे सुरूच राहील.