सुफियाना स्वरांना मखमली साज : सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात गाणार कैलाश खेर नागपूर : कैलाश मेहेरसिंह खेर. उत्तर प्रदेशातील मिरतमध्ये जन्मलेला हा मुलगा आपल्या वडिलांना कबीराची गीते म्हणताना ऐकत राहायचा. यातूनच त्याला संगीताची ओढ लागली आणि पायाला भिंगरी बांधल्यागत तो फिरत राहिला संगीताच्या नवनव्या अध्यायांचा शोध घेत. या भटकंतीतूनच त्याच्या आयुष्याला ‘सुफियाना’ रंग चढला आणि आवाजाला एक वेगळी ‘कशीश’ लाभली. तोच कैलाश मेहेरसिंह खेर अर्थात आजचा कैलाश खेर भारतीय सुफी संगीताचा पर्याय बनला असून, लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने तो शनिवारी नागपुरात आपल्या या ‘सुफियाना’ गायकीचे अनेक रंग उधळणार आहे. होय, कैलाश खेर आपल्या शहरात येतोय. २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण समारंभात त्याला लाईव्ह ऐकण्याची संधी आहे. तरुणाईसह सर्वच वयोगटातील संगीतप्रेमींमध्ये कैलाश खेरचे एक विशेष आकर्षण आहे. याला कारणही तसेच आहे. त्याचे जादूई स्वर थेट हृदयात उतरतात. डोळे बंद करून त्याला सलग ऐकत राहावे, इतके त्याचे स्वर ‘दैवी’ वाटतात. पण, इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. शिक्षणासाठी वयाच्या १३ व्या तो वर्षी दिल्लीला आला. तेथे संगीताच्या एका वर्गात दाखल झाला. पण, भाकरीच्या लढाईसाठी संगीत सोडावे लागले. अखेर एका मित्रासोबत साड्या निर्यातीचा व्यवसाय केला. पण त्यात मोठा तोटा झाला. या घटनेतून आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी कैलाश खेर ऋषिकेशला जाऊन राहिला. तिथल्या साधूसंतांसाठी गाणी म्हणू लागला. येथेच त्याच्या गाण्याला सुफियाना देणगी लाभली आणि कैलाश खेर गायक म्हणून घडत गेला एका नव्याने आत्मविश्वासाने. अशा या प्रतिभावंत गायकाला परिवार चाय प्रस्तुत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात प्रत्यक्ष ऐकता येणार आहे. संजय काकडे ग्रुप यांच्या सहयोगाने होणाऱ्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक तिरुपती अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड,नागपूर, असोसियट स्पॉन्सर युवराज धमाले कॉर्पोरेशन तर टेलिकास्ट पार्टनर कलर्स मराठी आहेत. (प्रतिनिधी) पहिली कमाई पाच हजार आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेला कैलाश खेर वयाच्या २९ व्या वर्षी मुंबईला आला आणि एका चाळीत राहू लागला. वर्ष-दीड वर्षे संगीत स्टुडिओच्या वाऱ्या केल्या. अखेर एक दिवस राम संपत यांनी त्याला जाहिरातीच्या गाण्यासाठी बोलावले. ते जाहिरात गीत झाले आणि कैलाश खेरला पाच हजार रुपये मिळाले. ते पैसे त्याला बरेच दिवस पुरले. पुढे नवीन संधी मिळत गेली आणि कैलाश खेरच्या आयुष्याने उंच भरारी घेतली. कैलाश खेर याने गायलेल्या दिवानी तेरी दिवानी..., चांद शिफारीस जो करता..., रब्बा इश्क ना होवे...,अल्लाह के बंदे सुन ले... या गाण्यांनी त्याला यशाच्या शिखरावर नेऊन बसविले. अशा मिळतील पासेस या कार्यक्रमासाठी मर्यादित आसन व्यवस्था आहे. त्यामुळे लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्ट आणि लोकमत कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ओळखपत्र दाखवून प्रत्येकी दोन नि:शुल्क पासेस दिल्या जातील. सोबतच लोकमतमध्ये प्रकाशित होणाऱ्या या कार्र्यक्रमाच्या जाहिरातीचे कटिंग आणणाऱ्यालाही दोन नि:शुल्क पासेस दिल्या जातील. या पासेस सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकमत सखी मंचच्या कार्यालयातून प्राप्त केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच कार्यालय- २४२३५२७, ५२८, ५२९ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
शनिवारी निनादणार...हो गई मै तेरी दिवानी!
By admin | Published: March 23, 2017 2:11 AM