नवी दिल्ली - भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे प्रामुख्याने घोषित करण्यात आली. त्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यानंतर, गडकरी यांनी पक्षाचे आभार मानले असून रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाचेच सरकार येईल, असेही गडकरींनी म्हटले.
भाजपाने देशातील 184 उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील पहिल्या यादीत दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये, नितीन गडकरी, प्रितम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे यांसह विद्यमान 14 खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर होताच नितीन गडकरींनी भाजपाचे आभार मानले. तसेच, नागपूरमधील जनतेचे प्रेम आणि विश्वासावर रेकॉर्डब्रेक मतांनी माझा विजय होईल आणि केंद्रात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात एनडीएचेच सरकार निवडून येईल, असा विश्वास गडकरींनी बोलून दाखवला आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतानाच, काँग्रेसने पटोले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नागपुरात पटोले विरुद्ध गडकरी ही लढत निश्चित मानली जात होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, गडकरी आणि पटोले हे दोन्ही सामंजस्य नेते असल्याने येथील निवडणूक रंगतदार आणि खेळीमेळीची होईल असेच दिसते.
मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आर्शीवाद कायम राहतील. तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत असं गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तर, नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन, असे उद्गार काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी येथे काढले होते. त्यामुळे नागपूरच्या दोन दिग्गज नेत्यांमधील लढत रोमांचक पण तितकीच मजेशीर असणार आहे.