नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०२०-२१ बॅचच्या प्रोबेशनर्स अधिकाऱ्यांनी गुरुवारी मेट्रो भवनला भेट दिली. मेट्रो प्रकल्पाच्या पायाभरणीपासून पायाभूत सुविधांमध्ये गाठलेल्या सर्वोच्च शिखरापर्यंतची इत्यंभूत माहिती सादरीकरणाद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीतून घेतली.
प्रशिक्षणाअंतर्गत या आयएएस अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दर्शनाचा दुसरा टप्पा सुरू असून ते प्रशिक्षणासाठी नागपुरात आले आहेत. मेट्रो प्रकल्पाची प्रत्यक्ष झलक पाहण्यासाठी आणि त्याचे मूलभूत कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी मेट्रोभवनला भेट दिली. महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना महामेट्रोची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी मेट्रोभवनातील विविध विभागांना भेटी दिल्या. महामेट्रोला मिळालेले पुरस्कार आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील उपलब्धी, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. महामेट्रोने साकारलेल्या प्रकल्पाचे या अधिकाऱ्यांनी कौतुक केले.