विष्णुदेव साय : खनिज प्रसंस्करण प्रयोगशाळेचे उद्घाटनहिंगणा : खनिज संपत्तीचे देशाच्या विकासात महत्त्वाचे स्थान आहे. ‘इंडियन ब्युरो आॅफ माईन्स’च्यावतीने देशभरातील खनिजावर करण्यात येणारे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘इंडियन ब्युरो आॅफ माईन्स’च्यावतीने करण्यात सदर कार्य हे देश व समाजहितासाठी गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय खाण व पोलाद राज्यमंत्री विष्णुदेव साय यांनी केले. नागपूर - हिंगणा मार्गावरील आयसी चौकात असलेल्या ‘इंडियन ब्युरो आॅफ माईन्स’च्या खनिज प्रसंस्कारण प्रयोगशाळा व प्रायोगिक संयंत्राचे रविवारी दुपारी विष्णूदेव साय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ‘इंडियन ब्युरो आॅफ माईन्स’च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी अतिथी म्हणून ‘इंडियन ब्युरो आॅफ माईन्स’चे महानियंत्रक आर. के. सिन्हा, भारतीय खाण ब्युरोच्या इंदिरा रवींद्रन, अधीक्षण अधिकारी डॉ. डी. आर. कानुनगो, एस. आर. भगत आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आयबीएम’चे कार्य हे देशातील इतर उद्वोगांना चालना देणारे कार्य आहे. खनिजातील धातू, मिनरल, रसायन यांचा शोध घेण्याचे व त्याचे विश्लेषण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रयोगशाळेत केले जात आहे. त्यामुळे देशाच्या विकासात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री विष्णुदेव साय यांनी केले.सुरुवातीला साय यांनी खनिज प्रसंस्कारण प्रयोगशाळा व प्रायोगिक संयंत्राचे उद्घाटन केले. मायस्क्रोपमुळे खनिजातील विविध धातू व मिनरलचा शोध घेणे सहज शक्य होणार असल्याने याबाबत त्यांनी संशोधकांकडून माहिती जाणून घेतली. फिल्म प्रोजेक्टरद्वारे त्यांना विविध बाबींची विस्तृत माहिती देण्यात आली. खनिजातील धातू आणि मिनरलच्या संशोधनासाठी आधुनिक एक्स रे मशीनचा वापर केला जात असल्याची माहिती इंदिरा रवींद्रन यांनी प्रास्ताविकातून दिली. विष्णुदेव साय हे ‘आयबीएन’ या संस्थेला भेट देणारे पहिले केंद्रीय मंत्री आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. संस्थेच्यावतीने विष्णूदेव साय यांच्यासह सी. एम. डी. धवन व कुंदर्गी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संचालन डॉ. संध्या लाल यांनी केले तर डॉ. डी. आर. कानुनगो यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
देशहितासाठी ‘आयबीएम’चे कार्य गौरवास्पद
By admin | Published: May 30, 2016 2:32 AM