लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट ( आयसीएससी) तर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग १० वीच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. सीबीएसईनंतर आयसीएससीमध्येही नागपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत अखिल भारतीय स्तरावर बाजी मारली आहे. हाती आलेल्या निकालानुसार आयसीएससीमध्ये नागपूरच्या चंदादेवी सराफ विद्यालयाचा श्रीनभ अग्रवाल या विद्यार्थ्याने ९९.२० टक्के गुण प्राप्त करीत देशात तिसरे स्थान पटकाविले आहे. श्रीनभ हा विदर्भासह महाराष्ट्रातही प्रथम स्थानावर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याशिवाय याच शाळेतील प्रेक्षा यादव या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण घेत विदर्भात दुसरे तर सामिया अन्सारी या विद्यार्थिनीने ९६.८ टक्के गुण मिळवत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. यासोबतच शहरातील इतर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. शहरातील आयसीएससी बोर्डाशी संबंधित तीन शाळा आहेत. या शाळांमधून मिळालेल्या माहितीनुसार सर्व तिन्ही शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. मंगळवारीच आयसीएससीच्या वग १२ वीचेही निकाल जाहीर झाले आहेत, मात्र नागपुरातून यामध्ये एकही विद्यार्थी सहभागी नव्हता.संशोधनाकडे कलआयसीएससीमध्ये ९९.२ टक्के गुणाने देशात तिसरा आलेल्या श्रीनभने त्याच्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. दहावीच्या परीक्षेची तयारी करताना कुठलीही संभ्रमावस्था नव्हती, असे त्याने सांगितले. टॉप करायचे आहे हा विचार मनात नव्हता पण काय, कसा व किती अभ्यास करायचा याबाबत जाणीव होती, असे त्याने स्पष्ट केले. भविष्यात विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस श्रीनभने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
तणाव येऊ दिला नाहीआयसीएससीच्या परीक्षेत चंदादेवी सराफ विद्यालयाचीच सामिया अन्सारी या विद्यार्थिनीने ९६.८ टक्के गुणांसह विदर्भात तिसरे स्थान प्राप्त केले आहे. लोकमतशी बोलताना ती म्हणाली, १० वीची परीक्षा असल्याने मनावर दडपण येणे स्वाभाविक असते. अशावेळी कुटुंब आणि शिक्षकांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यक असते. यामुळे स्वत:वरील तणाव निवळण्यास मदत मिळते आणि सोबतच मनाप्रमाणे यश मिळविणेही सहज शक्य होते. आज लागलेल्या निकालामुळे ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. संपूर्ण सत्राच्या वेळी कुटुंबाचे आणि शिक्षकांचे नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे कधी अभ्यासाचे दडपण आले नाही आणि स्वत: येऊही दिले नाही. अगदी दहावीच्या पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू केला. परीक्षेच्या काळातही स्वत:ला तणावापासून दूर ठेवले व त्याचा फायदाही झाला. भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा सामियाने व्यक्त केली आहे.