नागपूर : रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) हा वातानुकूलित, हवाबंद, स्वच्छ असावा असा नियम आहे, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वॉर्ड क्र. २४, अतिदक्षता विभागातील चित्र याच्या उलट आहे. याची दखल अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी घेऊन वॉर्ड २५ला ‘आयसीयू’चे स्वरुप देण्याचे कार्य हाती घेतले आहे. यामुळे लवकरच रुग्णांसोबतच काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे.
औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अंतर्गत येणारा अतिदक्षता विभाग पूर्वी चार खाटांचा होता. १९९० मध्ये नव्या अतिदक्षता विभागाचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यावेळी ३० खाटांचे नियोजन होते, मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा विभाग २६ खाटांपर्यंतच मर्यादित राहिला. यातही हा विभाग अतिदक्षता आणि दक्षता या दोन भागात विभागला गेला. अतिदक्षता विभागात वातानुकूलित यंत्र आणि ५ खाटांची सोय, तर दुसऱ्या भागात २१ खाटांची सोय करण्यात आली. हा संपूर्ण विभाग वातानुकूलित असावा असा नियम असताना वातानुकूलित यंत्रात बिघाड झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते बंद आहेत. यातच स्वच्छता गृहाची लाईन बुजल्याने विभागात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे रुग्णांसह डॉक्टर, परिचारिकांना काम करणे अडचणीचे जात होते. विशेष म्हणजे, हा विभाग बाहेर झाडीझुडपाने वेढला आहे. यामुळे किटकांचा नेहमीच त्रास होतो. मागे या सर्व समस्यांच्या तक्रारी झाल्या. परंतु तात्पुरत्या उपाययोजनानंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण होत होती. अखेर डॉ. गुप्ता यांनी यावर तोडगा काढत वॉर्ड २५ला अतिदक्षता विभागाचे स्वरुप देण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांसोबतच डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
-नवे आयसीयू ३० खाटांचे
नव्या ‘आयसीयू’मध्ये २४ खाटा अतिदक्षताच्या तर ६ खाटा दक्षता अशा एकूण ३० खाटा असणार आहेत. आॅक्सिजन पाईप लाईनचे काम सुरू झाले असून आवश्यक यंत्रसामुग्रीसह महिन्याभरात रुग्णसेवेत हे आयसीयू सुरू होईल.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल