आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये नाशिक व अमरावती या दोन ठिकाणी आयसीयू सुरू करण्याचे निश्चित झाले असून आणखी चार जिल्ह्यांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत भास्कर जाधव, मनोहर भोईर आदींनी सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली. सदस्यांनी गेल्या वर्षी राज्यात १४,३६८ बालमृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापैकी ३०१३ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या उत्तरात केंद्र सरकारच्या एसआरएस सर्वेचा हवाला देत सांगितले की, २०११ मध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एक हजार मुलांमागे २५ अर्भकांचा मृत्यू होत होता. तो आता १९ वर आला आहे. तर देशात सरासरी अर्भकमृत्यूचा दर ३४ इतका आहे. महाराष्ट्र केवळ केरळ आणि तामिळनाडूपेक्षा मागे आहे. या मुद्यावर केरळलाही मागे टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी तीनस्तरीय योजना तयार करण्यात करण्यात आली आहे. यात न्यू बॉर्न केयर सेंटर, न्यू बॉर्न स्टॅबिलेशन युनिट आणि स्पेशल न्यू बॉर्न केयर युनिटची स्थापना करण्याचा यात समावेश आहे.डॉक्टर व परिचारिकांची पदे भरली जाणारडॉ. सावंत यांनी डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, डोंगर परिसरासाठी महसुलाचे नियम बदलण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचारी (परिचारिका) कुठून आणणार असे सांगत वाद ओढवून घेतला. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले, असे असेल तर आमदारांना सांगा, प्रत्येक आमदार एक यादी देऊ शकतो.
नवजात बाळांसाठी सहा जिल्ह्यात आयसीयू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:07 PM
राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली.
ठळक मुद्देआरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधानसभेत घोषणा