भाऊ लोखंडे : ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ विषयावर चर्चासत्र नागपूर : प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी केले. समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन व मार्गदाता प्रकाशक समूह यांच्यावतीने ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ या विषयावर लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक, अॅड. हंसराज भांगे वक्ते होते. मार्गदाता पत्रिकेचे संपादक दिलेश मेश्राम अध्यक्षस्थानी होते. डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम, समता सैनिक दलाचे जी. वासुदेवन व्यासपीठावर होते. डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, आंबेडकरी समाज राजकारणात शून्य झाला आहे. केंद्रापासून राज्य आणि अगदी स्थानिक पातळीवरही तो शक्तिहीन झाला असून राजकीय नेत्यांच्या चुकांचा हा परिणाम आहे. त्यामुळे समाज दिशाहीन होत गेला आहे. देशाची सत्ता प्रतिगामी शक्तींनी काबीज केल्यानंतर आरक्षण व्यवस्था संपविण्यात व पुढे संविधान बदलण्याचे षड्यंत्र ते रचत आहेत. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकजूट करून संघर्ष उभारण्याची गरज आहे. समाज वेळीच सावध न झाल्यास भविष्य कठीण आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अनिल वासनिक यांनी आंबेडकरी समाजाच्या राजकीय स्थितीवर अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वरज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवाची मीमांसा त्यांनी यावेळी केली. अपेक्षित राजकीय यश न मिळण्यास एकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. यावेळी राहुल दहिकर, के.जी. पाटील, मिलिंद फुलझेले, मधुकर बोरीकर, दिनेश खोब्रागडे, चंदू लाऊत्रे, बी.टी. वाहाणे, दिगंबर चनकापुरे, अरुण गायकवाड, धम्मपाल वंजारी, रत्नाकर मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी) संघटित व्हा अॅड. हंसराज भांगे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगून रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि अस्ताची सविस्तर माहिती दिली. आंबेडकरी समाज राजकीयदृष्ट्या संघटित झाल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिलेश मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून नागरिकांना राजकारणाचे व संघटनांचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले.
आंबेडकरवादी गाफिल राहिले तर मोठे संकट
By admin | Published: March 19, 2017 3:06 AM