नागपूर : बालवयात होणारा मधुमेह हा दुर्मिळ आहे. लहान मुलांमध्ये होणारा हा मधुमेहाचा प्रकार ‘टाईप-१’ या नावाने संबोधला जातो. डॉक्टरांच्या मते, बाळ पूर्वीच्या तुलनेत वारंवार डायपर ओले करत असेल, त्याला वरचेवर तहान लागत असेल, भूख लागत असेल, वजन कमी होत असेल तर डॉक्टरांना तातडीने दाखविणे गरजेचे ठरते. ‘टाइप वन’ मधुमेहाची ही लक्षणे असू शकतात.
बालवयात मधुमेह होण्याचे नेमके कारण अजून सापडलेले नाही. आपल्या शरीरात जठराच्या मागे स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते त्यात इन्सुलीन तयार करण्यासाठी ‘बीटा’ पेशी असतात. बाल-मधुमेहींमध्ये काही कारणाने रोगप्रतिबंधक यंत्रणा (ऑटोइम्युनिटी) या बीटा पेशींना परके ठरवते व एखाद्या जंतूवर हल्ला केल्याप्रमाणे ‘बीटा’ पेशींवर हल्ला करते आणि अर्थातच यात बीटा पेशींचा नाश होतो. यातून ‘टाईप-१’ मधुमेहाचे निदान होते. मधुमेहाचे निदान होणे म्हणजे पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. त्या अजाण वयात इन्सुलीन इंजेक्शन व आहारावरील बंधने त्यांच्यावर लादताना पालकांची कसोटी लागते. मात्र मधुमेह जर नीट नियंत्रणात असेल तर या मुलांच्या शैक्षणिक जीवनात बाधा येत नाही पुढे वैवाहिक जीवनही सुखात घालवू शकतो.
-ही आहेत लक्षणे
:: पूर्वीच्या खूप जास्त लघवी होणे
:: खूप जास्त तहान लागणे
:: खूप जास्त भूक लागणे
:: वजन कमी होणे
-आई-वडिलांना मधुमेह असेल तर...
‘टाईप-१’मध्ये आई-वडिलांना मधुमेह असेल तर मुलांना मधुमेह होईलच असे नाही. त्याला विषाणू, प्रदूषण, आनुवंशिकता या सारखे अनेक घटक जबाबदार ठरतात. परंतु काळजी घ्यायला हवे, लक्षणांकडे लक्ष ठेवायला हवे.
कोट...
लहान मुलांमध्ये होणारा हा मधुमेहाचा प्रकार ‘टाईप-१’ या नावाने ओळखला जातो. याची सामान्य लक्षणे म्हणजे, पूर्वीच्या तुलनेत बाळ अधिक प्रमाणात लघवी करीत असेल, त्याची तहान आणि भूक वाढली असेल आणि अचानक वजन कमी झाले असेल तर डॉक्टरांना दाखवायला हवे. ही लक्षणे मधुमेहाचीच असतील असे नाही.
-डॉ. परिमल तायडे, मधुमेह तज्ज्ञ