नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे सरकार आल्यास राज्यात ओबीसी आरक्षण देण्यात येईल, असा दावा केला. नागपुरात ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असलेला मागासवर्गीयांचा अहवाल भाजपचे सरकार कसा तयार करेल हे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले. शासकीय यंत्रणेचा पूर्ण उपयोग करून ओबीसी समाजाच्या अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे ध्येय असल्याचे सांगताना समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अहवाल सर्वसमावेशक असावा यादृष्टीने आम्ही अहवाल तयार करू, असे बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जे मध्य प्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्र सरकारला जमले नाही. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिला याची खंत वाटते. महाविकास आघाडीचे सरकार याबाबतीत गेंड्याच्या कातडीचे असल्याची टीका त्यांनी केली.