मनपा आयुक्तांचे आश्वासन : जनमंचला पाचारण करून केली चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात बांधण्यात येणाऱ्या ज्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट व समाधानकारक नसेल त्या कामाचे पैसे कोणत्याही परिस्थितीत कंत्राटदाराला दिले जाणार नाहीत, असे आश्वासन महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांनी जनमंचच्या शिष्टमंडळाला दिले. जनमंचॉने सर्वप्रथम पुढाकार घेत शहरात बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रोडच्या गुणवत्तेची तपासणी करीत निकृष्ट बांधकामाविरोधात आवाज उठविला होता. सिमेंट रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट बांधकामाचे पुरावेही प्रशासनासमोर सादर केले होते. महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांच्यासमक्षही पाहणी करण्यात आली होती. जनमंचच्या पुढाकाराची दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित रस्त्यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांनी शुक्रवारी जनमंचच्या प्रतिनिधींना महापालिकेत चर्चेसाठी पाचारण केले व सिमेंट रोडबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीच्या सुरुवातीपासूनच आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. जनतेचा पैसा वाया जाऊ नये यावर लक्ष ठेवण्याचा जनतेला अधिकार आहे आणि जनमंच ही जबाबदारी पार पाडून मनपा प्रशासनाला मदतच करीत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली़ सिमेंट रस्त्यांचा दर्जा चांगला असावा याबाबत महापालिका आग्रही आहे. ज्या सिमेंट रस्त्याचे काम समाधानकारक नसेल त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत कंत्राटदाराला दिले जाणार नाहीत, असे आयुक्त मुदगल यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले. काही ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे अहवाल जिओटेकने दिले आहेत. त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले़ सिमेंट रस्त्यांच्या १३००० पॅनेलपैकी जवळपास २७५ पॅनेल निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते संबंधित कंत्राटदारांच्या खर्चाने बदलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले़ रस्त्यांच्या व्यतिरिक्त दुभाजकांना लावलेले उभे दगड, पुलांवर आणि फुटपाथला समांतर लावलेले गट्टू, पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या नाल्या आणि या नाल्यांवरील झाकणे या सर्वच बाबतीत समस्या आहेत याकडे जनमंच प्रतिनिधींनी आयुक्तांचे लक्ष वेधले़ विशेषत: पावसाळा तोंडाशी असताना नाल्या साफ करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाळ्यात बिकट परिस्थिती ओढवू शकते ही गोष्ट त्यांनी आग्रहाने सांगितली़ त्यावर नाल्या सफाईचे काम सुरूच असून त्याला आणखी गती देण्यात येईल, असे आयुक्तांनी आश्वासन दिले़ सर्वप्रथम हा विषय लावून धरल्याबद्दल मनपातर्फे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी जनमंचचे आभार मानले. जनमंचने यापुढेही अशीच भूमिका घेऊन मनपा प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ मनपातर्फे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि त्यांचे सहकारी, जिओटेक या कन्सल्टिंग कंपनीचे संचालक शिंगारे, व्हीएनआयटीचे डॉ़ इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. जनमंचच्या वतीने अॅड़ अनिल किलोर, प्रा़ शरद पाटील, प्रकाश इटनकर, अमिताभ पावडे, प्रमोद पांडे, नरेश क्षीरसागर आणि अॅड़ मनोहर रडके यांनी चर्चेत भाग घेतला़ तर विरोधी पवित्रा घेऊ अॅड़ अनिल किलोर यांनी मनपाच्या भूमिकेवर समाधान व्यक्त करतानाच दर्जेदार कामाचा आग्रह जनमंच सोडणार नाही. भविष्यातही गरज पडल्यास जनमंच पुन्हा विरोधाचा पवित्रा घेऊ शकेल, असा स्पष्ट इशारा दिला़
सिमेंट रोड निकृष्ट असेल तर कंत्राटदाराला पैसे नाही
By admin | Published: May 27, 2017 2:39 AM