संघाचे आरोपांवर प्रत्युत्तर : काँग्रेसकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीकानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये थकविणाऱ्या सुनील टालाटुले प्रकरणातील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच प्रत्युत्तर दिले आहे. सुनील टालाटुले यांनी शेतकऱ्यांशी केलेले आर्थिक व्यवहार हे वैयक्तिक आहेत. टालाटुले जर दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात संघावर चिखलफेक करून काँग्रेसने विकृत राजकारण केले असल्याची टीका महानगर संघचालक राजेश लोया यांनी केली आहे.सुनील टालाटुले नावाचा हा कापूस व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. त्याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटीहून अधिक रुपये थकविले. यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टालाटुले हा संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे शेतकऱ्यांनी संघावर नाराजी व्यक्त केली होती व २८ फेब्रुवारी रोजी संघ मुख्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला होता. ‘भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेस’ या नावाखाली संविधान चौकात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.टालाटुलेंवरून काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रथमच प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. टालाटुलेचे संघाशी संबंध जोडून संघ मुख्यालयावर मोर्चा, उपोषण आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप लावणे चुकीचे आहे. भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्या नावावर काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करत असल्याचा आरोप प्रसिद्ध पत्रकातून महानगर संघचालक राजेश लोया यांनी केला आहे.काँग्रेसची ही जुनी मानसिकता या आरोपातून प्रतित होत असल्याचा टोलाही लगावण्यात आला आहे. काँग्रेसचे हे आंदोलन संघाला बदनाम करणारे असून यावेळी स्वयंसेवकांनी संयम राखण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दोषी असल्यास टालाटुलेवर कारवाई व्हावी
By admin | Published: March 09, 2016 3:26 AM