मनपा कुंभकर्णी झोपेत भिंती, खांब-झाडांचे विद्रुपीकरण कायद्याचे उल्लंघन नागपूर : स्मार्ट सिटीकडे दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात कुठे मेट्रो रेल्वेचे पिलर उभारले जात आहेत तर कुठे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु शहरातील इमारती व भिंती विद्रूूप करणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या संदर्भात जागरूक नागरिक वारंवार तक्रारी करतात. परंतु कुंभकर्णी झोपेतील महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. अतिक्रमण, अवैध होर्डिंग व बॅनर संदर्भात न्यायालयाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे न्यायालयाने विद्रुपीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे निर्देश दिल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार आहे. शहरातील भिंतीवर अवैध व पोस्टर व बॅनर सर्रास लावले जात आहेत. त्यातच स्वत:च्या प्रचारासाठी भिंतीवर मजकूर लिहिण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोकांची मनमानी व स्वार्थी वृत्तीमुळे स्मार्ट सिटी मोहिमेला गालबोट लावण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास शहरातील भिंती, सार्वजनिक ठिकाणे व चौकांचे विद्रुपीकरण होण्याचे प्रकार न थांबल्यास स्मार्ट सिटी अभियान संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही.अवैध होर्डिंग, बॅनर तसेच विद्रुपीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई करता येते. झोनच्या सहायक आयुक्तांना हे अधिकार आहेत. त्यानुसार संबंधिताना दंड आकारता येतो. तसेच कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यास पोलिसात तक्रार करता येते. परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मजकूर लिहिणाऱ्यांना आळा कोण घालणार? शहरातील बहुसंख्य भागातील भिंती व सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, दुकानदार, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्थांनी लिहिलेले संदेश निदर्शनास येतात. कोणत्याही प्रकारची अनुमती न घेता असे संदेश लिहिले जातात. वास्तविक महापालिकेच्या स्थापत्य विभाग संबंधिताकडून जाहिरातीचे शुल्क वसूल करू शकतो. शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाई होईल उपराजधानीला देशातील नंबर वन स्मार्ट सिटी करण्याचा महापालिके चा संकल्प आहे. विविध विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सोबतच नागपूर शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. कुणी प्रचारासाठी शहरात अवैध होर्डिग व बॅनर तसेच भिंतीवर मजकूर लिहित असेल तर अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देेश प्रशासनाला देण्यात येतील. - नंदा जिचकार, महापौर अवैध होर्डिग विरोधात निरंतर कारवाई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अवैध होर्डिग, बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनातर्फे निरंतर कारवाई सुरू आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका
- तर न्यायालयानेच दखल घ्यावी
By admin | Published: March 23, 2017 2:03 AM