गुन्हा केला नाही तर, भीती कशाची? हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:24 PM2020-12-31T23:24:19+5:302020-12-31T23:25:32+5:30
High Court slapped petitionersसंशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीकरिता पोलीस वारंवार घरी येऊन विचारपूस करीत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करणाऱ्यांना फटकारण्यात आले. तुम्ही गुन्हा केला नाही तर भीती कशाची, असा सवाल न्यायालयाने त्यांना विचारला. तसेच, ५०० रुपये दावा खर्च बसवून त्यांची याचिका फेटाळून लावली.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये वैशाली सुरेश मस्के व इतर चार जणांचा समावेश होता. वैशाली यांचे पती सुरेश विठोबा मस्के यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस वारंवार घरी येतात. सारखी विचारपूस करून मनस्ताप देतात. त्यामुळे मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे. पोलिसांची कृती अवैध असून त्यांना असे करण्यापासून थांबविण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावर सरकारने स्वत:ची बाजू मांडताना याचिकाकर्त्यांच्या बेकायदेशीर कृतीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकाकर्ते पोलिसांना बयान देण्यास नकार देत आहेत. ते चौकशीकरिता योग्य सहकार्य करीत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरतेने घेतली. पोलिसांवर अविश्वास दाखविण्याचे काहीच कारण दिसत नाही. याचिकाकर्त्यांनी पोलिसांना योग्य सहकार्य केले पाहिजे. याचिकाकर्त्यांना या प्रकरणात त्यांची काहीच भूमिका नाही असे वाटते तर, कुणाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ही याचिका दाखल केल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत पुन्हा वाढली आहे. याचिकाकर्त्यांवरील संशय पुन्हा गाढ झाला आहे, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले.