वसंत पिंपळापुरे : भारतीय मजदूर संघाचे आंदोलननागपूर : कामगारांच्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्यांवर केंद्र शासनाने चुप्पी साधली असून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष पुरवून त्या त्वरित पूर्ण न केल्यास लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशा इशारा भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष वसंत पिंपळापुरे यांनी दिला.कामगारांच्या प्रलंबित १२ मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्यावतीने संविधान चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात श्रम सुधाराच्या नावाखाली श्रमिक कायद्यात केलेले बदल त्वरित थांबवून सरकार, उद्योगपती आणि कामगार संघटनांसोबत त्रिपक्षीय चर्चा करावी, रेल्वेसारख्या उद्योगातील परकीय गुंतवणूक थांबवावी, सार्वजनिक उद्योगांचे भाग विक्री करून केले जाणारे खासगीकरण थांबवावे, किमान वेतन कायद्यात सुधारणा करून किमान १५ हजार वेतन द्यावे, अंगणवाडी इतर कामगारांना कामगार समजून त्यांना वेतन, भत्ते, पेन्शनची सुविधा द्यावी, ईपीएस पेन्शनधारकांना ५ हजार पेन्शन द्यावी, ट्रेड युनियनची नोंदणी ४५ दिवसाच्या आत करावी, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्याची ठोस अंमलबजावणी करावी, वाढत्या महागाईवर अंकुश लावावा आदी मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. आंदोलकांनी ‘राष्ट्र के हित के लिए करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम’, ‘कोण बनाता हिंदुस्थान, भारत का मजदूर, किसान’ आदी घोषणा देऊन आपल्या मागण्या रेटून धरल्या. यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील, प्रदेश महामंत्री अशोक भुताड, जिल्हा सचिव गजानन गटकेलवार, प्रसिद्धीप्रमुख सुरेश चौधरी यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)