लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोनाबाबत रेल्वे बोर्डाने घालून दिलेले नियम न पाळल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार आरपीएफला अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. रेल्वे अॅक्टनुसार होणाऱ्या या कारवाईत त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने अनेक नियमात बदल केला. सध्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी, पूर्वीच्या तुलनेत २५ टक्के गाड्याच सुरू आहेत. या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यात रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क घालणे, रेल्वेस्थानक तसेच परिसरात न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे. हे नियम कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. परंतु अनेक प्रवासी या नियमांचे पालन करीत नाहीत. ते कुठेही थुंकतात. परंतु त्यांच्यावर कारवाईचे अधिकार गाडीतील टीटीई किंवा आरपीएफला नसल्यामुळे ते आतापर्यंत केवळ सूचना देऊ शकत होते. बहुतांश प्रवासी त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते. यामुळे आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आता तसे होणार नसून रेल्वे बोर्डाने एक नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार मास्क न घालणाऱ्या तसेच थुंकणाऱ्या प्रवाशांंवर आरपीएफ रेल्वे अॅक्ट १४५,१५३,१५४ नुसार कारवाई करू शकणार आहे. रेल्वे रुळ ओलांडणारे प्रवासी, विना तिकीट प्रवासी यांच्यावर जशी कारवाई होते, तशीच कारवाई आता कोरोनाचे नियम तोडणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. आरपीएफ प्रवाशांना मास्क घालण्याची तसेच न थुंकण्याचा सल्ला देणार आहे. तरीसुद्धा प्रवाशांनी न ऐकल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
नव्या नियमानुसार होणार कारवाई
रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार कोरोनाचे नियम तोडणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रवाशांना आधी सूचना देण्यात येईल. त्यांनी न ऐकल्यास त्यांच्याविरुद्ध रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल. रेल्वेगाड्यात गस्त घालणारे जवानही प्रवाशांवर कारवाई करू शकणार आहेत.
अरुण कुमार स्वामी, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल,
दपूम रेल्वे नागपूर विभाग