लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रण व उपाययोजनांसाठी महापालिका प्रशासनाने दिलेली जबाबदारी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, मुख्यालय व झोन स्तरावरील कर्मचारी पार पाडत आहेत. अशा फ्रंंटलाईन वर्कर असलेल्या १५ कर्मचाऱ्यांचा काेरोनामुळे मृत्यू झाला, तर सहा कर्मचाऱ्यांचा ड्युटीवर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे, वेळीच बेड मिळाले असते, तर काहींचा जीव वाचला असता. मनपाच्याच फ्रंट लाईन वर्करलाच बेड मिळत नसेल, तर शहरातील गरीब व गरजू रुग्णांचा जीव वाचवणार कोण, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. कोरोनाग्रस्तांना वेळेवर उपचार मिळतील, अशी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी मनपावर आहे. नागपूर शहरात परिस्थिती गंभीर आहे. दररोज सहा ते सात हजार बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांनाच बेड मिळत नसेल, तर शहरातील गंभीर रुग्णांचा जीव कसा वाचविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजना, मदत, उपचार असे कर्तव्य बजावताना कोरोनायोद्ध्यांचा मृत्यू झाल्यास, मृताच्या वारसांना ५० लाखांचा वैयक्तिक अपघत विमा लाभ लागू केला आहे. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप याचा लाभ मिळालेला नाही.
....
मनपा रुग्णालयात उपचार शक्य
इमामवाडा येथील आयसोलेशन व गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात मनपा कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी १० बेड राखीव ठेवल्यास गंभीर रुग्णांना उपचार घेणे शक्य आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू अशा सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. याची मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
....
आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उपचार मिळावे
कोरोना नियंत्रणात आघाडीवर काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मृत्यू होत आहे. कोरोनात फ्रंट वर्कर कर्मचाऱ्यांना उपचार मिळावे, यासाठी मनपा रुग्णालयात व्यवस्था करावी, मृतकांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाॅईज असोसिएशन (इंटक) चे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.