नागपूर : सरकारने शब्द दिला म्हणून मूक आंदोलन थांबविले आहे. पुन्हा काही दिवस वाट पाहण्याची आमची तयारी आहे. मात्र, शब्द पाळला जाणार नसेल, तर पुन्हा एकदा मूक आंदोलन करू, असा इशारा खा. संभाजीराजे यांनी दिला.
महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सकल मराठा समाज विदर्भचे मुख्य संयोजक राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. विश्वजितसिंग किरदत्त, जयसिंग भोसले यांचीही उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या निनादात सभेला सुरुवात झाली. संभाजीराजे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार या दोघांच्याही जबाबदाऱ्या काय आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही. राज्य सरकारने परिपूर्ण मांडणी करून त्रुटी भरून काढाव्या. राज्यापालांकडे मसुदा सोपवावा. त्यांनी केंद्रीय आयोगाकडे व नंतर राष्ट्रपतींकडे निर्णयासाठी सोपवावा. केंद्राने अधिनियम १०२ चा वापर करून घटनादुरुस्ती करावी, वटहुकूम काढावा. निदान राज्य सरकारच्या हातात आज जे आहे, ते तरी करावे. मूक मोर्चातील सर्व मागण्यांचा विचार सरकारनेच करावा.
यावेळी संग्रामसिंग महाराज यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजे मुधोजी भोसले यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश शिर्के यांनी केले, तर आभार बबलू साळवे यांनी मानले.
नक्षल्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे
नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेतदेखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असल्याचा दावा केला आहे. कायदा हातात घेऊन काम करा असे शिवरायांनी कधीच सांगितले नव्हते. नक्षलवाद्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
आता जबाबदारी जनप्रतिनिधींची
संभाजीराजे म्हणाले, आक्रोश आणि ठोक मोर्चे आताही काढता येतील. मात्र, आज ही वेळ नाही. आरक्षण कसे मिळवता येईल, हे समजून घेण्याची गरज आहे. मैदानातील लढाई आम्ही केली, आता जबाबदारी जनप्रतिनिधींची आहे. आमदार, खासदार जनतेचे नोकर आहेत. आता आम्ही जनप्रतिनिधींनीच यासाठी पर्याय सांगितला पाहिजे. अधिवेशनात दोन तास वेळ द्या. यावर चर्चा घडवा. पर्याय सांगा. आमचा विरोध कुणालाही नाही. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन बोला.
मला खऱ्या अर्थाने शाहू-छत्रपतींचा वंशज व्हायचेय !
छत्रपतींच्या घराण्यात मी जन्मलो म्हणून वंशज असल्याचा मला अभिमान आहे. मात्र, मला शाहू-छत्रपती यांचे खऱ्या अर्थाने वंशज व्हायचे आहे. शिवाजी महाराजांची आयुष्यभर मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केले. राजश्री शाहू महाराजांनी राजवाडे बांधले नाही, बहुजन समाजाला न्याय दिला. मलासुद्धा त्याच मार्गावर चालून गरीब मराठ्यांना, वंचितांना न्याय द्यायचा आहे. समाजाला अहोरात्र वेळ द्यायचा आहे.
...