कमलेश वानखेडे, नागपूर : राजकीय पक्षात आपण पदासाठी, पॉवरसाठी राहत नाही, एका आदर्शसाठी राहतो. काही लोकांना फक्त पद हवे असते. पद मिळाले नाही की ते पक्ष सोडतात. ज्याला काँग्रेस सोडून जायचे असेल त्याने लवकर जावे. जो पक्षाची विचारधारा व मुल्ये घेऊन काम करतो तो पक्ष सोडणार नाही, असे खडेबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मिलिंद देवरा यांचे नाव न घेता सुनावले.
विभागीय आढावा बैठकांसाठी चेन्नीथला यांचे गुरुवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. येथून ते अमरावतीला आयोजित बैठकीसाठी रवाना झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, कुणाला पक्ष सोडून जायचे असेल तर त्यांनी जावे, आमची हरकत नाही. ते गेल्यामुळे काँग्रेसचे कुठलेही नुकसान होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस सक्षम आहे. येथे कुणीही काँग्रेस सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या एखाद्या नेत्यावर ईडीची कारवाई झाली का, कुणाला अटक झाली का, असा सवाल करीत विरोधकांना राजकीय दृष्टया दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हा पोलिटिकल इव्हेंट
- अयोध्येत प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भाजपने या सोहळ्याला पोलिटिकल इव्हेंट केले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे. चार शंकराचार्य यांनी जाण्यास नकार दिला आहे. या मागे त्यांचा काहीतरी विचार असेलच. प्रभू श्रीरामांबद्दल आमच्या मनातही निष्ठा आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर आम्हीही अयोध्येला जावू, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.