गणेश हूड
नागपूर : मार्च -एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करुन निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी. अन्यथा केंद्रात पुन्हा मोदींचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिला.
मनुस्मृती दहन दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे आयोजित भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेच्या माध्यमातून आंबेडकर यांनी विदर्भातील संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे. जो कोणी उमेदवार असेल ती जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा, ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजे. यासाठी वाट्टेल ते करा, मीच उमेदवार आहे असे समजून निवडणुकीसाठी सज्ज राहा, एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाच्या नावाखाली राज्यात मराठा-ओबीसी व धनगर - आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे. यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे. ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. ती पुन्हा जिवंत होऊ द्यायची नसेल तर संसदेवर ताबा मिळवा. आपल्या विचारांचा पराभव झाला तर देशात पुन्हा प्रतिक्रांती होईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.
यावेळी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, महासचिव अरुंधती क्षीरसाट, प्रदेश उपाध्यक्षा निशा शेंडे आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुजात आंबेकर, शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्यासह जिल्हा अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेत पारित करण्यात आलेले ठराव- २५ डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा.-महिला आरक्षणात ओबीसी, मुस्लीम महिलांना आरक्षण देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी.-मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी.-बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून आरक्षण जाहीर करावे.