सदर रोगनिदान केंद्र : रुग्णांची संख्या रोडावली गणेश हुड/आनंद डेकाटे नागपूर महापालिकेच्या सर्वात चांगल्या रुग्णालयात सदर येथील रोगनिदान केंद्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो. येथे केवळ बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आहे. रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा येथे नाही. फक्त निदान आणि उपचार केले जातात. येथे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय रुग्णही मोठ्या संख्येने येतात. परंतु रुग्णालयाकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष आणि काळानुरूप अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे मागील काही वर्षांत येथील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या तीन वर्षांचाच विचार केला असता मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या रोडावली आहे.सदर रोगनिदान केंद्र हे शहरतील जुन्या रुग्णालयापैकी एक आहे. कालांतराने याचा विस्तार करण्यात आला. नवनवीन विभाग सुरू झाले. तशी येथील रुग्णांची संख्याही वाढली. परंतु दरम्यानच्या काळात रुग्णालयातील सुविधांकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे येथील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. येथील बाह्य रुग्ण विभागातील रजिस्टर बुकमधील नोंदणीनुसार तीन वर्षांपूर्वी रुग्णालयात दररोज सरासरी १५० ते १७५ रुग्ण उपचारासाठी येत असत. सध्या ही संख्या १२५ ते १५० पर्यंत खाली आली आहे. २०१३-१४ मध्ये ४८,९५० रुग्णांनी लाभ घेतला. २०१४-१५ मध्ये ही संख्या ४२,८९२ वर पोहोचली तर २०१५-१६ मध्ये ४०,८३८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी यात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव सामान्य तपासणीसोबतच या रुग्णालयात पॅथालॉजी, एक्स-रे आणि नेत्ररोग विभाग आहे. परंतु पॅथालॉजीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री नसल्याने बहुतांश तपासणीसाठी खासगी पॅथालॉजीमध्येच पाठविले जाते. एक्स-रे विभागाचीही तशीच अवस्था आहे. किमान थ्रीडी एक्स-रेची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी रुग्णांची अपेक्षा आहे. नेत्ररोग विभागाची मशीन अनेक महिन्यांपासून बिघडली आहे. परंतु ती दुरुस्तसुद्धा केली जात नाही. रुग्णालय अपग्रेड व्हावे सदर येथील रुग्णालय जुने आहे. पूर्वी चांगली सेवा मिळायची. आताही मिळते. परंतु चांगली यंत्रसामुग्रीच उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेर जावे लागते. रुग्णालयातच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास रुग्ण त्याचा लाभ घेऊ शकतील. यासाठी फार निधीचीही आवश्यकता नाही. यासंदर्भात केवळ रुग्णच नव्हे तर येथील कर्मचारी स्पष्टपणे काहीही सांगत नसले तरी रुग्णालय अपग्रेड व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. ईसीजी बंद रुग्णालयात ईसीजीची सुविधा आहे. परंतु अनेक महिन्यांपासून ते बंद आहे. कारण काय कुणालाच माहिती नाही. ज्या ठिकाणी ईसीजी काढले जाते तिथे नेहमीच कुलूप लावलेले दिसून येते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयातून ईसीजी काढावे लागतात. कोट्यवधीची जागा पडून सदरसारख्या बाजारभागात महापालिकेचे रोगनिदान केंद्र आहे. अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी येथे ्रजागा उपलब्ध आह. परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांची रुग्णालय अपग्रेड करण्याची इच्छा नसल्याने येथील कोट्यवधींची जागा वापराविना पडून आहे. अद्ययावत रुग्णालय उभारल्यास दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपुरातील गरजू रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो.
सुविधाच नाही तर रुग्ण येणार कसे?
By admin | Published: April 27, 2017 2:07 AM