लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिकांप्रमाणे महापालिका प्रशासनही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. १० जूनपर्यंत पावसाबाबत अनुकूल स्थिती दिसून आली नाही तर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी याबाबत संकेत दिले आहे. मात्र सध्या पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्य शासनाच्या निर्देशानुसार तोतलाडोहच्या डेड स्टॉकमध्ये असलेल्या १५० एमएमक्युबमधून ३० एमएमक्युब पाणी घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यानुसार दररोज १.२६ एमएमक्युब पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र महापालिका दररोज एक एमएमक्युब पाणी घेत आहे. तरीही येत्या तीन-चार दिवसात पावसाची स्थिती अनुकूल दिसली नाही तर पाणी पुरवठ्याबाबत १० जूनला विशेष बैठक बोलावून पुढचे पाऊल उचलले जाईल, असे संकेत झलके यांनी दिले. सध्या मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. पत्रकारांशी चर्चा करताना पिंटू झलके यांनी मान्सूनच्या स्थितीमुळे चिंता वाढली असल्याचे नमूद केले. डेड स्टॉकमधून पाणी घ्यावे लागत आहे. राज्यातील इतर शहरांपेक्षा नागपूरची स्थिती चांगली आहे, मात्र पाण्याचा दुरुपायोग रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.लोक वाहने धुवायला, कुलरमध्ये, अंगणात टाकण्यासाठी पिण्याचा पाण्याचा उपयोग करीत आहेत. बांधकाम करण्यासाठीही या पाण्याचा उपयोग केला जात आहे. ही प्रवृत्ती थांबविण्यासाठी लोकांना जागृत करण्याचे काम केले जात आहे. मात्र लोकांनी दुरुपयोग थांबविला नाही तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर नियम बनविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.त्यांच्यानुसार मागील वर्षी नॉन नेटवर्क परिसरात ३७८ टॅँकर सुरू होते, ते आता ३४२ पर्यंत कमी झाले आहेत. नेटवर्क परिसरात सध्या १५० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एका टॅँकरद्वारे जास्तीत जास्त आठ ट्रीप केल्या जात आहेत. टॅँकरवर अवलंबून राहण्याची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. शहरात ३३ हजार अवैध नळ कनेक्शन आहेत. त्यापैकी ८१२ नियमित करण्यात आले आणि ११८ चे कनेक्शन कापण्यात आले आहेत. वर्षभर ही मोहीम राबवून संबंधित नळ कनेक्शन नियमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रमाणे बांधकामासाठी जेथेही पिण्याचा पाण्याचा वापर केला जात आहे, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मनीषनगरमध्ये एकावर तर सतरंजीपुरा येथे दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.एक लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचा दररोज उपयोग होणारे ५४ ग्राहक आहेत. त्यापैकी ५२ शासकीय विभागांचा समावेश आहे. अशा विभागांना एसटीपी/ईटीपी लावून पाण्याचा पुनर्उपयोग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एप्रिल २०२० पर्यंत त्यांना ही व्यवस्था करावी लागणार असल्याचे झलके यांनी स्पष्ट केले. यावेळी समितीच्या श्रद्धा पाठक, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.भूजलासाठी अतिरिक्त शुल्कशहरात मोठ्या संख्येने नागरिक भूजलाचा उपयोग करीत आहेत. जमिनीतील पाणी ही शासकीय संपत्ती आहे. त्यामुळे भूजल साठ्यातील पाण्याचा उपयोग थांबविण्यासाठी संपत्ती करात अतिरिक्त जलकर वसुलीचे प्रावधान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्यातरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, मात्र लवकरच यावर निर्णय घेऊन नियम बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात पाऊस रुसला तर पाणीपुरवठ्यात कपात निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:02 AM
सामान्य नागरिकांप्रमाणे महापालिका प्रशासनही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. १० जूनपर्यंत पावसाबाबत अनुकूल स्थिती दिसून आली नाही तर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी याबाबत संकेत दिले आहे. मात्र सध्या पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देजलप्रदाय समिती सभापतींनी दिले संकेत : डेड स्टॉकमधून दररोज एक एमएमक्युब पाणी