लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही जीवनात जे करता, त्यामागचे कारण माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला कुणाची दया आली तर मदत करता. पण दयेमुळे मदत न करता त्या व्यक्तीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब बघितले तरच खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा करता येईल, असे मत डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले.‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या वार्षिक परिषदेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. वाटवानींचा जीवनप्रवास उलगडला. यावेळी ते बोलत होते.डॉ. वाटवानी म्हणाले की, निराधार मनोरुग्णांसोबत कार्य करणे कठीण आहे. यामुळे अनेकदा काम सोडून द्यावे, असेही वाटले. परंतु प्रतिकूल व कठीण परिस्थितीतून बाहेर येणारी माणसे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरणेमुळे काम करता आले. आर्थिक, सोशल वर्करला भाषा येत नाही. त्याचा वैद्यकीय इतिहास माहीत नाही. त्यामुळे रस्त्यावरील निराधार मनोरुग्णांवर उपचार करणे कठीण जाते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.सामाजिक कार्यात भावनेचे महत्त्व सांगताना डॉ. वाटवानी म्हणाले की, जेव्हा काम करणे सुरू केले तेव्हा माझ्यावर पाच लाख १५ हजारांचे कर्ज होते. पण त्या रुग्णासोबत भावना जुळली आणि कर्जाचा विचार न करता रुग्णांची सेवा केली, असेही ते म्हणाले. डॉ. वाटवानी यांनी आतापर्यंत हजाराहून अधिक निराधार मनोरुग्णांची सुश्रुषा केली आहे. त्यांना आजारातून बरे करीत घरी पोहोचविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना सामाजिक कायार्साठी २०१८चा ‘रमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
-आणि बाबा आमटे भावूक झालेहेमलकसाला जाताना डॉ. वाटवानींना ‘स्किझोफ्रेनिक’ रुग्ण दिसला. त्याचे हात व पाय बेड्यांनी बांधले होते. रुग्णाला बाबा आमटेंच्या प्रकल्पात घेऊन गेले. डॉ. प्रकाश आमटेंनी त्याच्यावर सुश्रुषा केली. रात्री ४ च्या सुमारास डॉ. वाटवानींना बाबा आमटे रडताना दिसले. डॉ. वाटवानींनी विचारले असता ते म्हणाले होते की, समाज एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे कसे बांधून ठेवू शकतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे वाटवानींना सुचविले. सायकेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अश्विन भट्टड व सचिव प्रवीण नवखरे यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.