लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फटका बसल्याने लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. शहरांमध्ये अनेक फ्लॅट तयार होऊन रिकामे पडले आहेत. कर्जाचा हप्ता कमी आला तर सर्वसामान्यांना घर-फ्लॅट घेणे शक्य होईल. जर किमती कमी झाल्या तरच घरांची विक्री होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘क्रेडाई’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी यांनी रविवारी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.बिल्डर आपली किंमत पकडून आहेत. सध्याची वेळ ही किंमत पकडून ठेवण्याची वेळ नाही. परिस्थिती चांगली झाली की मागणी वाढेल तेव्हा पुन्हा आपले दर बिल्डरांना ठरवता येतील. बांधकाम व्यवसायातील उद्योजकांनी गुंतवणुकीवर घेण्यात येणारे व्याज कमी घेऊन किमती कमी केल्या पाहिजेत.देशाच्या अर्थव्यवस्थेत बांधकाम उद्योगाचा महत्त्वाचा सहभाग आहे. ‘एमएसएमई’च्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य कसे होईल याचा विचार करू, असे गडकरी यांनी सांगितले. केंद्र शासनाकडे रस्त्यांची खूप कामे आहेत व निधीही आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यांच्या कामातदेखील उतरावे, असेदेखील गडकरी म्हणाले.
ग्रामीण भागात स्मार्ट व्हिलेज बांधाशासन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर बांधत आहे. बांधकाम व्यावसायिकांनी शासनाशी संपर्क साधून तयार असलेली घरे कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर म्हणून घ्यावे, असा प्रस्ताव द्यावा. ग्रामीण भागात अत्यंत कमी किमतीत जागा उपलब्ध होईल व गरिबांसाठी कमी किमतीत घरे उपलब्ध होतील. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी शहरापेक्षा ग्रामीण भागात ‘स्मार्ट व्हिलेज’ तयार करावेत, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.