अभय लांजेवार
उमरेड : गावखेड्यापासून ते शहरातसुद्धा डेंग्यूने पाय पसरले आहे. खासगी रुग्णालयात डझनभर तर उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यापेक्षाही अधिक रुग्ण डेंग्यूच्या आजाराने बेजार झालेले दिसतात. सरकारी दवाखाना गरिबांचा समजला जातो. अशातही ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूची रक्त चाचणी नागपूर मेडिकलला पाठविल्यानंतर अहवाल (रिपोर्ट) मात्र उशिरा प्राप्त होत आहेत. आठवडाभरानंतर रक्त चाचणी अहवाल येत असेल तर संबंधित रुग्णावर औषधोपचार कसे होतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय झटपट डेंग्यू आजाराचे निदान करणाऱ्या किट रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामुळे मोठ्या आशेने औषधोपचारासाठी आलेल्या रुग्णांवर खासगी तपासणीचा अधिकचा भुर्दंड बसत आहे.
निवडणुकीच्या प्रचार रॅलीत कधी ‘नेते’ तर कधी ‘अभिनेते’ आरोग्य सेवेबाबत आश्वासनांची खैरात वाटतात. प्रत्यक्षात शासन मात्र गोरगरीब-सर्वसामान्यांच्या या हक्काच्या दवाखान्यासाठी सेवा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. आरोग्य सेवेबाबत शासनाकडे पुरेसा निधी का नाही, अचानकपणे उद्भवलेल्या साथीच्या सर्वच रुग्णांवर किटच्या माध्यमातून ताबडतोब तपासणी का केली जात नाही, असा नागरिकांचा सवाल आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी ग्रामीण रुग्णालय गाठत या ठिकाणी डेंग्यूच्या आजारावर औषधोपचार घेणाऱ्या बालक आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. डेंग्यूची चाचणी आम्ही खासगी लॅबमध्ये केली. त्यासाठी हजार ते पंधराशे रुपयाचा खर्च आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयातून चाचणीचा अहवाल येण्यास एक आठवडा लागतो, अशीही माहिती यावेळी मिळाली.
डेंग्यूचा आजार अधिकांश बालकांना होत आहे. आधी कोरोनाचा फटका आणि आता डेंग्यूचा ‘डंख’ सर्वसामान्य, गोरगरिबांना आर्थिक कोंडीत अडकविणाराच ठरत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
-----
महिनाभरात ८१ रिपोर्ट
उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयातून नागपूर मेडिकलला ३० जुलै ते १७ ऑगस्टपर्यंत ८१ रुग्णांच्या रक्त चाचणी नमुने पाठविण्यात आले आहेत. अहवालच उशिरा येत असल्याने असंख्य रुग्णांना तातडीने खासगी लॅबमध्ये चाचणी करावी लागते. यासाठी अधिकचे पैसेसुद्धा मोजावे लागतात.
-----
केवळ १० किटस्
उमरेडच्या रुग्णालयात भिवापूर, कुही तालुक्यातील रहिवासीसुद्धा औषधोपचारासाठी येत असतात. दररोज शेकडो जणांची तपासणी या रुग्णालयात होते. अशावेळी केवळ १० डेंग्यू किटस् या दवाखान्यात उपलब्ध आहेत. रुग्णालयाने मागील वर्षीच्या काही उरलेल्या किट्स आता वापरल्या, अशी माहितीसुद्धा यावेळी मिळाली. अवघ्या अर्ध्या तासात झटपट डेंग्यू पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ही बाब या किटमुळे लक्षात येते. ग्रामीण रुग्णालयाने २०० किटची मागणी केली होती, अशीही बाब समोर येत आहे.
---
आम्ही डेंग्यू रुग्णाबाबत अधिक जोखीम घेत नाही. रुग्ण गंभीर असल्यास रेफर टू नागपूर करतो. शिवाय किटपेक्षा रक्त चाचणी स्वरूपातील चाचणी ही अधिक पारदर्शक असते.
डॉ. खानम् खान
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उमरेड